माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

इंग्रजी शाळा,सरकारी शाळा व आपण

"सर, सर आम्ही आता इंग्लिश मिडीयमचे दिसतोय ना...!" शाळेच्या पहिल्याच दिवशी चौथीच्या वर्गात शिकणारा लहानगा विशाल मला असे विचारीत होता. किंबहुना त्याच्या म्हणण्याला माझे अनुमोदन मागत होता. मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. तसाच काहीसा चक्रावूनही गेलो होतो. या लहानग्याच्या अनपेक्षित प्रश्नाने माझी विट्टी उडवली होती, असेच म्हणा ना. काही क्षण असेच गेले. त्याला नेमके काय सांगावे, हेच मला सुचत नव्हते. तो मात्र पुढे बोलतच होता- "आता आपले पोर बी भारी दिसाया लागल्यात. सगळ्यांना टाय हायेत. आयडेंटी कार्ड बी हाये. आता त्यांच्या ( इंग्लिश मिडीयमवाल्यांच्या ) शाळेत कोण जाणार नाय. सगळी पोर आपल्याच शाळेत येतील. बरोबर ना सर!" स्वतःला सावरत मी फक्त होकारार्थी मान डोलवली. तो खुश झाला होता. सर माझ्या म्हणण्याशी सहमत आहेत म्हणून माकडासारख्या टणाटण उड्या मारीत तिथून पाठमोरा झाला. पण तो तिथून गेल्यावर माझ्या मनात बरेच प्रश्न फेर धरून नाचू लागले होते. मोहळच उठले म्हणा ना...

नुकतेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे . शाळा प्रवेशाची लगबग अजूनही सुरूच आहे. आपल्या पोराला नेमके कोणत्या शाळेत घालाव, या संभ्रमात अनेक पालक दिसताहेत. आता गावाकडेदेखील इंग्लिश मिडीयमच्या शाळांची 'क्रेझ' निर्माण झाल्यामुळे गावातील मराठी माध्यमाच्या खासकरून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणा-यांची संख्या ब-यापैकी रोडावली आहे. शाळा सुरु झाल्यापासून अनेक शिक्षक मित्रांना पहिल्या वर्गात किती प्रवेश झाले? असे उत्सुकतेने विचारतो आहे. उत्तर ऐकून निराशा येते. जिथे गतवर्षी चौथ्या वर्गातून ५० मुले बाहेर गेली. तिथे आज अवघी १५,२०,२२...अशी मुले दाखल झाली आहेत! माझ्या मनात धोक्याची घंटा आधीपासून वाजायला लागलेली. आता तिचा आवाज खणखण असा ऐकू येत होता इतकेच. माझी अस्वस्थता वाढत गेली. विचार करू लागलो. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.

असे नेमके काय झाले की, एकाएकी मराठी शाळांच्या लोकप्रियतेला अशी ओहोटी लागलीय? उत्तर शोधताना अर्थातच शिक्षक जमातीतील असल्याने अंतर्मुख होऊन एका बाजूला विचार करीत होतो, आपल्याकडून काही गोष्टी जशा पाहिजे तशा झालेल्या नाहीत. हे खरेच, पण मधल्या काळात व्यवस्थेनेच शिक्षकांच्या आणि पर्यायाने सरकारी शाळाच्याही विश्वासार्ह्तेपुढे प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यातून नको तो संदेश समाजात गेला. आणि आता जेव्हा शाळा प्रवेशाची वेळ येते तेव्हा ग्रामीण, कष्टकरी, गरीब, आदिवासी, जिरायतदार शेतकरी अशा ज्या लोकांसमोर अन्य पर्याय नसतो, तेच लोक 'परंपरेने' आपली मुले गावाच्या शाळेत घालताहेत. अन्य पालकांत ज्यांच्याजवळ थोडेबहुत पैसे आले आहेत. ते आपली पोरे सरळ कायम विनानुदानित इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पाठवीत आहेत.

इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही वेगवेगळे स्तर आहेत. गावातील लहान व्यावसायिक,कर्मचारी, बागायतदार यांची मुले परिसरातल्याच कुठल्या तरी जवळपासच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जातात. ते आपल्या मुलाच्या शिक्षणावर वर्षाकाठी दोन-चार हजार खर्च करतात. ग्रामीण भागातील तालेवार कुटुंबातील म्हणजे प्रगतशील शेतकरी आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून तालुक्याच्या गावी राहायला गेलेल्यांची पोर तालुक्याच्या गावच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जातात. त्यांची वर्षाकाठी १५-२० हजार रुपये खर्च करण्याची तयारी असते. आता यात आणखीन एक मुलांच्या भवितव्याविषयी अत्यंत जागरूक आणि 'दक्ष' असा पालक वर्ग उदयाला आलाय. तो तर आपली पोर थेट सी.बी.एस.ई.किंवा आय.सी.एस.ई. शाळांमध्ये पाठवितो आहे. वर्षाकाठी लाखात रुपये खर्चून चांगले शिक्षण विकत घेतल्याचे समाधान ते मिळवीत असतात. समाजातील वाढत्या आर्थिक विषमतेचे प्रतिबिंब शाळामध्येही उमटते आहे. ते असे. या महागड्या एज्युकेशन म्यालमधील मुले मारुती, झेन अशा गाड्यांना डबडा गाड्या म्हणतात. आणि ती वाहने वापरणा-यांना गरीब लोक म्हणून त्यांची कीव करतात. त्यांच्या प्रति सहानुभूती प्रकट करतात. असो.

येथे तो मुद्दाच नाहीये. खरे तर कोणी आपले पोर कुठे घालायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याविषयी आपल्याला काही बोलायचे नाही. पण मग या इंग्लिश शाळांचे स्तोम नेमके माजले कसे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कारणमीमांसा केली. तेव्हा दिसले ते असे की, इंग्रजीवाचून त्यांच्या पोरांचे भवितव्य अंधारात राहील, इंग्लिशला पर्यायच नाही, इंग्रजी नाही आले तर नोकरीच्या संधी संकुचित होतील, असे अनेक आंग्लाळलेल्या पालकांना आज वाटू लागले आहे. पोराच्या 'करियर'चा मार्ग केवळ इंग्रजीच्या दारातूनच जातो, असा सरसकट समज म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा आज ग्रामीण भागात रूढ झाली आहे. त्यामुळेच आधी फक्त तालुक्याच्या गावांपर्यंत पोचलेले इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण आता गावापर्यंत पोचलेय. इंग्रजी शाळेत पोर घालणे जणू काही फशन झालीय की काय अशी एक शंका मनात येऊन जाते. दुसरे असे की, इंग्लिश मिडीयम सुरु कोणी केले तर अर्थातच शहरातील वरच्या वर्गाने. (मुळात ही मेक्वालेची थिअरी आहे की, आधी शिक्षण उच्चभ्रू लोकांना देऊन मग पुढे अपोआप ते झिरपत झिरपत तळागाळापर्यंत जाईल.) आता तर इंग्लिश जो शिकतो तो उच्चभ्रू होतो, असे जणू समीकरणच तयार करून टाकले आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे उलटून गेलीत तरी आपल्या देशात आजही इंग्रजी हीच 'सत्तेची' भाषा आहे. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय यांचे कामकाज तर सगळे इंग्रजीतूनच चालते. घटनेतील तरतुदीप्रमाणे आधी कोणताही कायदा आधी इंग्रजीतून तयार केला जातो आणि मग तो भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत होतो. हेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे. इंग्रजी शिकले की पैसा येतो आणि पैसा आला की सत्ता अपोआप येते, असे हे सोप्पे गणित आहे. म्हणूनच विशालसारखा तिसरीतला मुलगादेखील चांगले राहणे म्हणजे इंग्लिश मिडीयमचे असणे, किंवा फक्त तेथील मुलेच छान राहतात... अशी धारणा उराशी बाळगतो आहे. त्यातील एक प्रकारचे राजकारण लहान लहान मुलेही समजून घेऊ लागलीत. असो.

आता यात आस्थेची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील या इंग्लिश शाळांतून दिले जाणारे शिक्षण नेमके आहे तरी कसे? खरोखरच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जातेय का? पालक ज्या अपेक्षेनं मुलांना पाठवितात त्यांचे पुढे काय होते ? या प्रश्नांची उत्तरे काही सापडत नाहीत. कोणाला कदाचित कटू वाटेल, पण हे आजचे वास्तव आहे. एक म्हणजे तुटपुंज्या मानधनावर शाळा शिक्षकांना राबऊन घेतात. इंग्रजी माध्यमाच्या कायम विनानुदानित शाळा आज शिक्षकांच्या शोषणाचे अड्डे बनल्या आहेत. ग्रामीण भागातील इंग्लिश शाळांना चांगले शिक्षक मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण असे की इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या लोकांना पुढे फक्त आणि फक्त आणि फक्त ' एग्झिक्यूटिव्ह'चं व्हायचे असते! चांगला शिक्षक होणे हे त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट कधीच नसते. चुकून चांगले शिक्षक जर का मिळालेच तर ते एवढ्याशा पगारावर फार दिवस घासत बसत नाहीत. एखाद्या स्टेशनवर उभे राहिल्यासारखे ते थांबतात. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की ते निघून जातात. त्यामुळे शिक्षकांचे येणे - जाणे आता नित्याचे झाले आहे. वर्षभरात वर्गाला चार-चार शिक्षक होतात. त्यामुळे आज इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळा चांगल्या शिक्षकांच्या शोधात असतात, आहेत. चांगले शिक्षक मिळत नाहीत ही दस्तुरखुद्द संस्था चालकांचीच तक्रार आहे. मग अशी दैना असेल तर तेथे या जागरूक पालकांच्या मुलांना 'चांगले' शिकविणार तरी कोण?

आता हे असे असले तरी त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओघ मात्र दिवसेंदिवस वाढतोच आहे. सरकारी शाळांनी शे-दोनशेची देणगी मागितली तर का-कु करणारे पालक इंग्लिश शाळांच्या मागणीप्रमाणे डोनेशनसाठी पैसे काढून देतात. अगदी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता. हा नेमका काय प्रकार आहे, हे काही कळत नाही. यातला एक भाग असाही दिसतो की, ग्रामीण भागातील ज्या पालकांची पहिली पिढी शिकलेली आहे. शिकलेली म्हणजे अल्पशिक्षित, अर्धसाक्षर. पुढे यातीलच अनेकजण कर्तेधर्ते झाले. सुधारित शेती, लहान-मोठा व्यवसाय करू लागले. त्यातून त्यांच्याकडे थोडाफार पैसा आला. यात बहुसंख्य लोकांच्या घरात तर शिक्षणाची परंपराच नाही. त्यातही इंग्रजीची तर गंधवार्ताच नाही. आपल्याला नाही शिकता आले. पण आपल्या पोराला/पोरीला 'चांगलं' शिकवायचं... आणि मग हे चांगले शिक्षण जणू फक्त केवळ इंग्लिश शाळांतूनच मिळतेय, असा पक्का 'समज' या मंडळींनी करून घेतल्याचे स्पष्टपणाने दिसतेय. कुटुंबातील वातावरण पूर्णपणे ग्रामीण मराठी वळणाचे. (म्हणजे घरात मराठीतल्या कुठल्या तरी एका भाषेचा प्रकार बोलला जातोय आणि हे मुलं घरी आल्यावर त्यांच्याशी इंग्लिशमधून कोण आणि कसे बोलणार? हे प्रश्न पालकांना अजिबात पडत नाहीत.)

मुलं एकदा का तिकडच्या शाळेत घातली की झकपक ड्रेस, बूट, स्वाक्स, टाय, स्कूल ब्याग, वाटर ब्याग....केवढी मिजास असते त्या मुलांची! (आणि इकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तोच गणवेश असतो वर्षानुवर्षांचा. पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी...अर्थात ती 'चैन' या गरीब पालकांना परवडणारी पण नसते म्हणा.) गावोगावी फिरणाऱ्या स्कूल बसमधून ही टाईट-फाईट 'लुक'मधली मुले जेव्हा हाय... हेलो... गुड मोर्निंग... गुड बाय...असे काही म्हणू लागतात. तेव्हा त्यांचे पालक मनोमन केवढे सुखावतात. तिथली सैनिकी पद्धतीची शिस्त...बसायला बाके...भव्य इमारती...इतकेच नाही तर पेरेन्ट डे...मदर्स डे, फादर्स डे... आणि 'अन्यूअल डे'चा तो कल्चरल प्रोग्राम म्हणजे तर केवढे ग्रेट,ग्रांड सेलिब्रेशन असते ते. तिथला तो चमचमाट. पालकांच्या खर्चातून आणलेली रंगीबेरंगी ड्रेपरी. कोरिओग्राफरच्या नजरेच्या इशा-यावर आणि एखाद्या ढाकचिक...ढाकचिक गाण्याच्या तालावर मुलं जेव्हा स्टेजवर येऊन नाचू लागतात, तेव्हा पालकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटू लागते. अर्थात यावर टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही खर तर. पण ज्या अपेक्षेने पालक आपल्या पोरांना त्या शाळांमध्ये घालतात, खर्च करतात. त्याच नेमके काय होत? हा प्रश्न पिच्छा पुरवीत राहतो. आणि कोणीतरी ग्रेट व्हायचे तर इंग्रजी आलेच पाहिजे असे काही नाही. मध्यंतरी गुजरातमध्ये एक सर्वे झाला. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या (म्हणजे जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी,संशोधक वैगरे...) लोकांचे शिक्षण मातृभाषेतून झालेले होते. त्यांना कुठे भाषेची अडचण जाणवतेय? एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला तो हा की,गावातल्या सजग पालकांची मुले इंग्लिश मिडीयमला गेल्यामुळे त्यांनी गावातल्या शाळेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या शाळेवर नैतिक दबाव ठेवण्याची संधीही त्यांनी आपल्या हाताने गमावलीय.

आज ग्रामीण भागातील सरकारी शाळांची गाडी रुळावर येतेय. शिक्षकांची काही धडपड सुरु आहे. उपक्रमशीलता वाढतेय. बदलत्या गरजा लक्षात घेऊन शाळाही बदलत आहेत. शिक्षकांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. पट कमी होण्याचे संकट रोखण्यासाठी ते सरसावले आहेत. खरे तर जेवढा गाजावाजा झाला तेवढी पडझड झालेलीच नव्हती मुळी. पण मग एवढा मोठा गाजावाजा का झाला? याचे कारण सरकारी शाळा जेवढ्या बदनाम होतील तितके खासगी शाळाना रान मोकळे होणार आहे. आणि दुसरे म्हणजे जे जे सरकारी आहे ते ते वाईट आणि जे जे खासगी आहे ते ते चांगले अशी एक आपल्या समाज मनाची धारणा झालेली आहेच आधीपासूनच. सरकारी शाळांबाबत जी बोंब उठवण्यात आली त्यातला प्रमुख आक्षेप होता की, दर्जा आणि गुणवत्ता घसरली...आणि गुणवत्ता मोजण्याचे निकष काय तर लेखन-वाचन कार्यक्रम. मुळात गुणवत्ता म्हणजे विशिष्ट गोष्टी असे आपण ठरवून टाकलेय. गुणवत्तेचे निकष सर्व समाज घटकांना एकसारखे कसे काय असू शकतात? चांगला माणूस बनविणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण असे आपण बिंबवायला हवे. पण येथे मात्र जे सुरु आहे ते पाहून ' काय भुललासी वरलिया रंगा ' असाच सवाल विचारावासा वाटतोय. विशालसारखी मुले जेव्हा असा विचार करतात तेव्हा त्यात त्याचा काही दोष नाही तर ही पक्की धारणा ज्या समाजाने त्याला दिली आहे त्या समाजाकडेच बोट दाखवणे भाग पडते.

आता तर शिक्षकांचे सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरु आहेत. आता 'उडदामाजी काळे गोरे...' जगात कुठेही जा ते असणारच. पण धडपडणारे बेटे काही कमी नाहीत. त्यांनीच तर हे लावून धरले आहे ना. अजून तरी एक बरे आहे की सी.बी.एस.ई.किंवा आय.सी.एस.ई. शाळांचे महागडे खूळ ग्रामीण भागातील पालकांच्या डोक्यात घुसलेले नाहीये. नाही तर आज ना उद्या एखाद्या बुद्रुक गावात अशा शाळा निघतील आणि मग स्थिती आणखीनच बिकट होत जाईल. समाजधुरीण तोवर हे सारे पहात राहणार आहेत काय? हा खरा प्रश्न आहे. १० कोटींचा हा मराठी मुलुख. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या समूहाला मराठीतून वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्याचा विचारही करीत नसू तर आपल्या इतके करंटे आपणच ठरू. मुद्दा 'मी मराठीचा' नाहीच आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबत जगभरातील शिक्षण व भाषा तज्ञांचे एकमत आहे. मग व्यवस्था म्हणून आपण नेमके काय करतोय? हा खरा प्रश्न आहे. सरकार शिक्षणात वेळोवेळी काही 'क्वास्मेटिक चेंज' करीत असते. मग याबाबतही काही तरी पावले वेळीच उचलण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही अन्यथा एक एक करून सरकारी शाळा बंद होतील आणि ते हतबल होऊन पाहण्यापलीकडे मग आपण काहीच करू शकणार नाही.

विशालसारख्या एखाद्या मुलाला आपण मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकतोय (मग ती शाळा भली,बुरी कशीही असो !) हे जणू कमीपणाचे आहे, असे वाटू लागले आहे. इंग्लिश शाळातील मुले आपल्यापेक्षा कोणीतरी ग्रेट आहेत, असा विचार त्याच्या मनात चमकून जातो. यावरून त्यांच्या मनात काहीतरी सुरु आहे हे दिसून येते.विशाल त्या सर्वांचा प्रतिनिधी आहे. या कोवळ्या मुलांच्या शंकांचे समाधान करणे, त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे, ही 'एज्युकेशन कम्युनिटी' म्हणून आपली सर्वांचीच संयुक्त जबाबदारी नाही काय?

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )