माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!

शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे. निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे.... उत्तर

रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. .....

दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.

भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.

जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे - नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते.

या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.

कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा

पुढे निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला. खालच्या भागातील बारमाही पिके फुलवणारे प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर -अकोलेकरांच्या नजराणा खुणावू लागले. यातूनच ८० च्या दशकात 'कमिटेड वॉटर' विरुद्धचा लढा संगमनेर - अकोलेकरांनी खांद्याला खांदा लाऊन लढविला. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. १९८४ मध्ये भंडारद-याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर - अकोल्याला हक्काचे पाणी मिळाले. मात्र त्यातच पुढील पाणी संघर्षाचीही बीजे पेरली गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कमिटेड वॉटरविरुद्ध सुरु झालेला लढा पाण्याचे फेरवाटप या नंतर पुढे पाणी तापू लागलं. १९९० च्या दशकानंतर तर भंडारद-याचे पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे, आंदोलने, घेराव यातून काही जणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात केली. भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट. मात्र नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने ( मेरी) उपहारग्रहाद्वारे साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. यात अभ्यासात धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले. परंतु या धरणात गाळ साचलेला नाही, असे अभ्यासकांचे ठाम मत आहे.

धरणाची उंची वाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला. पाणलोट क्षेत्रातील आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. आमदार मधुकर पिचड यांनी आपले राजकीय वजन पणाला लावले. पुढे प्रस्ताव स्थगित ठेवण्याची ग्वाही मिळाली. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थतेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यानच्या काळात भांडरद-याच्या पाण्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता वीजनिर्मितीसाठीही होऊ लागला. भंडारदरा -१ आणि कोदणी येथील दोन जलविद्युत प्रकल्पातून ४४ मेगावाट वीज निर्माण केली जाते. धरण परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकास करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.भंडारद-याचा निळाशार, अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे.

तें बाकी काहीही असो. कोणत्याही दिवसातल्या म्हणजे बारा महिन्यातील कधीही पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे, यात मात्र कोणताही वाद नाही. येथील भेट आपल्याला निश्चित आनंद देते. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न करते.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )