माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

सह्यागिरीतला जलोत्सव

तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकायला लागतो, तसा येथला निसर्ग चैतन्याने मोहरतो. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेराला आल्यागत मोसमी पाऊस येथे रमतो. (सध्या तो रुसलाय बरं!) अवघ्या सृष्टीशी त्याचं गुज सुरु होतं. पाऊस म्हणजे सृष्टीचा साखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागते.

टपो-या थेंबांनी ओघळणारा पाऊस, पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, उताराच्या दिशेने खळाळत, उड्या घेत वाहात जाणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... दुथडी भरून वाहणा-या नद्या... लालसर विटकरी पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे... पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारे धुके... सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला मस्त गारवा... पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत, निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत असे निसर्गचित्र अवतीर्ण होते.

पावसाची रूपेही निरनिराळी असतात. आणि हो, इथल्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आहे. सूर आहे आणि तालही आहे... म्हणूनच त्याचे येणे अनेकांच्या दृष्टीने आनंदाचे गाणे होऊन जाते. त्याच्या येण्याची वाट अनेकजण आतुरतेने पाहातात. तो आला की, येथे जलोत्सव सुरु होतो. खपाटीला गेलेल्या जलाशयांची पोटं भरू लागतात. 'हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने...' असे म्हणत जलोत्सव पाहायला अंबोलीपासून, लोणावळा, माळशेज ते भंडारदर्‍यापर्यंत झिम्माड सरीत भिजायला केवढी झुंबड उडते!

अलिकडे तर मुंबई-पुणेकर मंडळी कुटुंबकबिल्यासह वीकेन्डला बाहेर पडतात, तेच मुळी इथल्या जलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी. पाऊस अंगावर घेत, धबधब्यांखाली मस्त भिजायचं. चिंब व्हायचं आणि गडकिल्ल्यांच्या माचीवरून सह्याद्रीच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतः हरवून द्यायचं, असा रिवाजच पडलाय. श्रावणाचा हिरवा रंग ताजा ताजा, हवाहवासा असतो. सगळे कसे जुळून आल्याने मग इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते. सप्तरंगात सारी सृष्टी न्हावून निघते. अशा सायंकाळी कातरवेळी गारवाची गाणी हमखास आठवतात... बालकवींच्या कवितेची आठवण हमखास येतेच येते...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )