माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

पर्यटन व्यवसायास संधी

अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायास उद्योगाचे स्वरूप आले आहे. काही देशांचे संपूर्ण अर्थकारणच पर्यटनावर अवलंबून असते. आपल्याकडेदेखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहरांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगांवर अवलंबून आहे. पर्यटनासारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मुळात या उद्योगाला मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळेच त्यात स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत. परदेशात जाऊन हॉटेल म्यानेजमेंटची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुण - तरुणींपासून गावाकडे रस्त्याच्या कडेला उभे राहून जांभूळ - करवंदे विकणा-या निरक्षर खेडूतांपर्यंत येथे संधीची विपुलता व समानता आहे. त्यामुळेच पर्यटनवृद्धीसाठी विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गतःच सह्याद्रीच्या परिसरात उपलब्ध आहे. त्यातही भंडार द-याचा परिसर तर त्यासाठी आदर्श असा आहे. मुख्य म्हणजे पर्यटन संस्कृती म्हणून जे काय असते, ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे.

अकोले तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. वेगवेगळ्या ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विभ्रम पहायला मिळतात. शिखर स्वामीनी कळसुबाई, तिलाच बिलगून असलेली अलंग, मदन, कुलंग या दुर्ग त्रिकूटाची अजस्त्र पर्वतरांग दक्षिणेला दुर्गराज रतनगड, कातराबाई, बहिरोबा [भैरव ] पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य अशी डोंगररांग या सगळ्या निसर्ग शिल्पांचे कोंदण लाभलेल्या परिसराच्या मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा नितांत सुंदर जलाशय. विश्रामगड, बितनगड, कुंजीरगड आणि निरनिराळ्या ऋतूत निसर्गाच्या सोहळ्याचे दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग म्हणजे हरिश्चंद्रगड आणि त्याचा तो मनमोहक परिसर तेथील उरात धडकी भरविणारा अक्राळ विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग देवतेला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू !

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या या परिसरातील जैवविविधता देशातील आदर्श ठिकाणांपैकी एक समजली जाते. याशिवाय गर्द वनराईच्या कुशीतून जाणा-या रानवाटा, प्राचीनतम वास्तु वैभावाची साक्ष देणारी अमृतेश्वर ( रतनवाडी ), हरिश्चंद्रेश्वर, टाहाकरी, सिद्धेश्वर, गंगा धरेश्वर, आम्लेश्वर ( अंभोळ ) ही मंदिरे घाटघर, कोदणीसारखे जलविद्युत प्रकल्प. आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाणारे भंडारदरा, निळवंडे यांसारखी जलमंदिरे. भन्नाट वा-याच्या झोताबरोबर गरागरा फिरणारे पवनचक्क्यांची भलीमोठी पाती, घाटनदेवीच्या परिसरातील डोळ्यांची पारणे फेडणारा सूर्यास्ताचा देखावा... आणखीन किती तरी.... पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो. रान आबादानी होत. तेव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडते. या जलोत्सवापुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते. तो म्हणजे काजवा महोत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्यांची लुकलुक आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्यांची प्रकाशफुले उधळीत असल्याचा भास काजव्यांचा महोत्सव पाहताना होतो. येथील दुर्ग, डोंगरमाथे, प्राचीन मंदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव... हे पहायला मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. फिरतात. पाहतात. आनंद घेतात. आणि आल्या पावलाने निघून जातात.

पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल. मात्र त्यासाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकतादेखील बदलली पाहिजे. सध्या रस्त्यांची अवस्था बरी असली तरी त्यात सुधारणेला मोठा वाव आहे. पर्यटन स्थळांविषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते. भंडारद-याला आलेला पर्यटक फार फार तर रंधा धबधबा, घाटघर. अमृतेश्वर मंदीरही ठिकाणे पाहतात आणि आल्या पावली मुंबई- नाशिकला परततात. हरिश्चंद्र गडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडेच्या विश्रामागडाची माहिती नसते. कळसुबाईला येणा-याना भंडारदरा माहित असतो. परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात. अकोले परिसरातील अगस्ती आश्रम, गंगाधरेश्वर, सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते. रंधा व इतर धबधबे पाहणा-याना आढळा नदीवरील किंवा मुळा खो-यातील धबधब्यांची पुसटशीदेखील कल्पना नसते. रानवाटा माहित नसतात.

पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणा-याना तास-दोन आधी आलो तर घाटनदेवीचा रमणीय सूर्यास्त पाहायला मिळतो हे त्यांच्या गावीही नसते. या सर्व पर्यटन स्थळांची एकत्रितपणे माहिती झाली. तालुक्यातील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन-तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो, अशी व्यवस्था निर्माण करून तसा विश्वास दिला. तर पर्यटक येथे रेंगाळतील. मग लोणावळा.,महाबळेश्वरसारखे पर्यटन येथे वाढीला लागेल. अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही, तर स्थानिकांची मानसिकतादेखील बदलणे तितकेच गरजेचे आहे. पर्यटनाकडे त्यांनी उपजीविकेचे, उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून पाहिले पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे.स्वच्छता, सुरक्षितता, विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात.

कोकणात अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाची जेवणाची व्यवस्था केली जाते. 'अतिथी देवोभव' ही संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे. त्यामुळे कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात. ही संस्कृती अकोले तालुक्यात रुजविण्याची आवश्यकता आहे. साध्य चलनी नाणे असलेल्या 'इको टुरिझम'साठी येथील परिसर तर आदर्शवत असाच आहे. म्हणतात ना 'बोलणा-याच्या करड्या विकतात. परंतु गप्प बसणा-याच्या बक्षी गव्हालाही कोणी विचारीत नाही.' आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात म्हणीला अधिकच महत्त्व आले आहे. अर्थात काय विकायचं हे विकणा-याला निश्चित भान आणि जाण पाहिजे. दाखविण्यासारख्या विक्री मुल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे हीच मुख्य अडचण आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगनापपूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटन स्थळातील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्त्य ऋषींची तपोभूमी असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे. त्यासाठी सुनियोजित प्रयत्न आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्राचा एकात्मिक विकास, रस्ते-दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिकांची मानसिकता बदलणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास नजीकच्या काळात पर्यटन हा अकोले तालुक्याचाही उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ शकेल. निसर्गाने दिलेच आहे मानवी प्रयत्नांची गरज आहे.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )