माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

देवरायांना ग्रहण

हरिश्‍चंद्रगड. पायथ्याशी कोथळे हे आदिवासी खेडे. त्याच्या उशाला बहिरोबाचा डोंगर. डोंगराच्या पूर्व उतारावर पसरलेली बहिरोबाची देवराई. आणि कोथळे गावचा दशरथ नाडेकर हा आदिवासी तरुण मित्र. गेल्या दहा वर्षापासूनची ही माझी सोयरे मंडळी. मनाला वाटेल तेव्हा गाडीला किक मारायची. जोडीदार असो नसो. पाऊलं आपोआप राईच्या दिशेनं पडायची. तिथला अभिजात निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा परिसर. मन उल्हासित होतं, जीवाला आल्हाद वाटतो. राईत जाणं, हळुवार पावलांनी फिरणं... सह्यगिरीला युगानुयुगाची साथसोबत लाभलेल्या वृक्षलता पाहणं... एका जागी शांत बसून महाराष्ट्राचा मानचिन्ह असलेला शेकरू डोळे भरून बघणं अन त्यानंतर वरच्या बाजूच्या कातळ कपारीतल्या चिंचोळ्या वाटेनं बहिरोबाचा डोंगरमाथा गाठणे आणि तोलारखिंडीच्या आसमंतातील हिरवागार निसर्ग नुसता बघत राहणं. काय पाहाल आणि किती पाहाल... तोलारचा उभा कातळ... बावटयासारखा फडकणारा हरिश्चंद्राचा बालेकिल्ला... लव्हाळीची घनगंभीर दरी... आणि समोरची आजोबापासून सुरु झालेली पूर्वेकडे पसरत गेलेली घनचक्कर थोरली पर्वतरांग... इत्यादी हे सारं अफाट अफाट... गेल्या -दहा वर्षांपासून नित्यनियमानं जाणं होतं.

मात्र या खेपेला जे काही पाहायला मिळालं ते पाहून मन खिन्न झालं. उदासवाणं वाटू लागलं. तिथं काय दिसलं माहितीये? देवराईला आग लावलेली. त्यामुळं एकर-दीड एकर परिसरातली झाडं-झुडुपे बेचिराख झालेली. राखेचा खच तेवढा पुढ्यात दिसतो आहे. जडावलेल्या पावलांनी कसाबसा थोडं अंतर चालून गेलो. तर मन आणखीनच विषण्ण झालं. असं काय होतं तिथं? तर तिथं तीन दगडाची चूल मांडलेली... भोवताली मटन मसाल्याच्या व इतर रंगीबेरंगी प्लॅस्टिक पिशव्यांचा, बाटल्यांचा खच पडलेला... उस्तरलेल्या कोंबडीची पिसं बाजूलाच पडलेली... जोडीला दारूच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या अस्ताव्यस्त!

आणखीन पुढे जावून पाहतो तर काय भर राईत बिघाभरातील झाडं तोडून तिथं लागवडीसाठी जमीन तयार केलेली. आणखीनच पुढं जाताना पावलागणिक काळजी वाढत चाललेली. त्याचं कारणही तसंच होतं. पूर्व आणि ईशान्य बाजूला लावलेल्या आगीची धग राईच्या आतल्या भागापर्यंत पोचल्याचं स्पष्टपणाने दिसत होतं. एरवी राईतून चालताना पायाला स्पंजसारखा जाणवणारा पालापाचोळ्याचा नैसर्गिक थर केव्हाच जळून खाक झालेला होता.

देवराई म्हणजे काय तर स्थानिक लोकांनी देवाच्या नावाने संरक्षित केलेलं जंगल किंवा राखलेलं वन. मनात एक प्रश्न सारखा घोळत होता. या बहिरोबाच्या राईला कोणत्या दुष्ट माणसाने आग लावली असेल? या आगीत अनेक शेकरू होरपळून गेले असतील... सरपटणार्‍या प्राण्यांची राख झाली असेल... आपला जीव वाचवण्यासाठी पक्षांची केवढी त्रेधा उडाली असेल? आणि युगानुयुगांची साथ देणा-या वृक्ष-लतांचं तर कसं होत्याचं नव्हतं झालं होतं ते तर डोळ्यांच्या कॅमे-यासमोर दिसत होतं.

बहिरोबाची ही देवराई अनेक दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक तर ती फार प्राचीन आहे. अनेक अंगा-उपांगांनी सजलेली-नटलेली. जैव वैविध्य हे येथील मुख्य वैशिष्ट्य. सह्यगिरीच्या कडे-कपारीत फिरताना महाराष्ट्र भूमीचं वर्णन कविवर्य गोविंदाग्रज ‘दगडांच्या देशा...’ किंवा ‘अंजन, कांचन, करवंदीच्या काटेरी देशा...’ असं का करतात, याची प्रचिती अनेकदा आलेली. राईत एक वृक्ष आहे. त्याचे स्थानिक नाव 'लोद' आणि शास्रीय नाव आहे- ficus NERVOSA. या महाकाय झाडाची बुंध्याजवळची गोलाई आहे ९.१३ मीटर, उंची आहे ३० मीटर आणि सरासरी विस्तार आहे ११.५० मीटर. अशी अनेक झाडे येथे आहेत. प्रत्येकाचं आपलं निराळं वैशिष्ट्य. येथील वैविध्य नैसर्गिकदृष्ट्या संरक्षित असल्यामुळे एकमेकाला उपयुक्त झाडांचे जैविक सहजीवन (Symbioitic Association) हा येथील आणखीन आगळा विशेष.

जंगलतोड किंवा एकूणच पर्यावरणाच्या -हासामुळं देशातल्या इतर ठिकाणी अत्यंत दुर्मिळ होत असलेली ऑरकिड्स येथे हमखास आढळतात. विविध प्रकारच्या नेचेवर्गीय वनस्पती (Pteridophytes), विविध प्रकारची शैवाल (Thallophyets), भूछत्रे (Bryophytes) यासारख्या जैव विविधतेच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या वनस्पती येथे अजूनपर्यंत टिकून आहेत. शेरोपेजीया (उरमोडी), स्मिथीया आणि थेरीया इंडिका(शिंगडमाकड) यासारख्या अत्यंत दुर्मिळ वनस्पती येथे आढळतात. रोपटं, फुलं, फळं आणि फिरून पुन्हा उत्पत्ती म्हणजे पुढची पिढी देवराईत जन्म घेते. ही निसर्ग साखळी येथे तुटत नाही. इतरत्र अनेक ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे किंवा अन्य कारणामुळे या साखळीत किंवा जीवचक्रात खंड पडला आणि त्या ठिकाणच्या प्रजाती नष्ट झाल्या. पुढे त्याचे काय काय दुष्परीणाम झाले हे आपण सारे पाहतो, अनुभवतो आहोत.

या पार्श्वभूमीवर एकूणच कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील सातही देवरायां बाबत आपण निर्धास्त होतो. येथील देवराया डॉ. कुक, डॉ. सिंग आणि डॉ. प्रधान, डॉ. अल्मिडा यांच्या पासून अलिकडच्या मोहन वामन यांच्यापर्यंत अनेक अभ्यासकांना नेहमीच खुणावत आल्या आहेत. अजूनही येथील काही भागातील अनाघ्रात निसर्ग अभ्यासकाना खुणावतो आहे. येथील वेली-फुलांनी सह्यगिरीचं अभिजात निसर्गसौंदर्य त्यामुळं आणखीन खुलून दिसतं! या परिसराचा काही वर्षांपूर्वी शास्रीय अभ्यास झाला. त्यात तब्बल ६२९ प्रकारच्या वनस्पतींची नोंद वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डॉ. मोहन वामन यांनी केलीय. पालापाचोळ्याचं खत वनस्पतींच्या वाढीला उपयुक्त असतं. ज्याला आपण वृक्ष म्हणून असं संबोधतो, अशी कित्येक प्रकारचे वृक्ष येथे आहेत. आयडियल पर्यावरणाचं इंडिकेटर म्हणून बोट दाखवलं जातं ते दगडफुल येथे भेटणार म्हणजे भेटणार. अगदी परवा-परवापर्यंत येथे झ-यांचं मंजुळ गाणं ऐकू येत होतं. ही राई कित्येक प्राणी, पक्षी, कीटक यांचे आश्रयस्थान बनलीय. शेजारचं भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो राज्याचे मानचिन्ह असलेला 'शेकरू' नामक प्राणी येथील जंगलात आढळतो. जिथं कनातीचं जंगल आहे, तिथंच शेकरू असते. ही बाब मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे. फायकस कुटुंबातली देशात दुर्मिळ अशा एका वनस्पतीची नोंद प्रसिद्ध वनस्पतीशास्रज्ञ डॉ.अल्मिडा यांनी पाच वर्षांपूर्वी येथे केलीय. जैव वैविध्याबाबत पश्चिम घाट जगभरातल्या १८ हॉटस्पॉट्सपैकी एक. आणि त्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग म्हणजे त्या माळेतला मेरुमणी शोभावा असा!

या देवराया जागवल्या, वाढवल्या त्या येथील रहिवाशांनीच. राईतली वाळलेली काटकी बी घरी आणायची नाय असा इथला कालपर्यंत रिवाज होता. मग झाडं तोडणं फारच दूरची गोष्ट! आणि उभ्या जंगलालाच आग लावणं म्हणजे कल्पनेच्या पल्याडची बाब. परंपरेचा संस्कार म्हणा किंवा परिस्थितीनं दिलेलं शहाणपण म्हणा त्यातून देवरायांचं जतन-संवर्धन होताना दिसत होतं. अगदी देवराइलगतची खासगी मालकीतली झाडं-झुडंदेखील कोणी तोडायचा नाही. राई गावाला अभिमानाचा विषय वाटत असे. त्यांच्या बोलण्या-वागण्यातून तसं जाणवायचं. आता मात्र हे सारं इतिहासजमा होवू पाहतेय. त्याची सुरुवात झालीय. म्हणूनच परवाच्या खेपेला राईत गेल्यावर जे दिसलं ते भयंकर वाटलं. वास्तवाच्या वणव्यात सापडून बेचिराख झालेली वनसंपदा पाहताना मन हळहळले, ठेचाळलं... देखणी राई चंगळवाद्यांच्या विळख्यात सापडलेली... तिची अवस्था पाहवेना.

फळं-कंदमुळं शोधण्यासाठी किंवा औषधी वनस्पती हुडकायला स्थानिक आदिवासी राईत जायचे. परंतु राईतील महाकाय वृक्ष तोडून तिथं कोणी शेताचा तुकडा तयार करील किंवा बहिरोबाच्या राईत कोणी कोंबडीच मांस शिजविण्याची हिम्मत करील. आणि असा हिम्मत करणारा तिथल्या स्थानिकांच्या तावडीतून सहीसलामत सुटेल अशी शक्यताच नव्हती. पण परवाच्या खेपेला मात्र माझा भ्रमनिरास झाला.

खरं तर या देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... त्यात कोणाचा फार मोठा उद्देश बिद्देश काही नाही. मात्र संबंधितांनी नेमकं काय केलं आहे त्यांना ठावूक नाहीये... वन्यजीव विभाग मात्र डोळ्यांवर कातडे ओढून आंधळेपणाचे सोंग घेऊन सारे पाहतो आहे. कारणे काहीही असुदेत या ग्रहणातून देवरायांची सुटका होणार आहे काय..?

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )