माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

हे 'धाडस' आपण दाखवा!

पश्चिम तमिळनाडूच्या मागास भागातील तरुण जिल्हाधिकारी डॉ. आर.आनंदकुमार यांनी आपली मुलगी गोपिका हिला तेथील इरोड नावाच्या गावातील पंचायत समितीच्या सरकारी शाळेत दुसरीच्या वर्गात घातले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत एकूण २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर, रिक्षाचालक, बिगारी कामगार यांची मुले बहुसंख्येनं या शाळेत शिकताहेत. मुख्य म्हणजे त्यांना मध्यान्ह भोजन, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके असे लाभ ही शाळा देते आहे, म्हणूनही काही पालक आपल्या मुलांना येथे पाठवीत आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकारी, पुढा-यांची मुले सोडाच; साधी त्या शाळेतील शिक्षकांची मुलेही तेथे शिकत नाहीत!

आपली पत्नी श्रीविद्या हिच्यासोबत आपल्या मुलीला घेऊन जिल्हाधिकारी महाशय जेव्हा सुट्टीनंतर मागच्या बुधवारी शाळेत गेले, तेव्हा रांगेत उभे राहिलेल्या या 'साहेबाला' आधी कोणी ओळखलेही नाही! नंतर जिल्हाधिकारी शाळेत आल्याचे समजल्यावर बहुतेक ते शाळा तपासणीसाठी आले असणार, म्हणून सा-यांचीच त्रेधा उडाली. परंतु साक्षात जिल्हाधिका-यांनीच जेव्हा आपण केवळ पालक म्हणून मुलीला शाळेत प्रवेश घ्यायला आल्याचे सांगितले तेव्हा मात्र सा-यांच्याच भुवया उंचावल्या. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी आपल्या मुलीला आमच्या शाळेत घेऊन येतील आणि प्रवेश मागतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका एस.राणी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे त्या जिल्ह्यात १५०० सरकारी शाळा, तीन केंद्रीय विद्यालये आणि अनेक खासगी शाळा असतानाही जिल्हाधिका-यांनी आपल्याच शाळेची निवड कशी काय केली, याचा मानसिक धक्काच शिक्षकांना बसला आहे म्हणे!

सरकारी शाळांच्या नावाने गळे काढणारी एक जमातच आपल्याकडे उदयाला आली आहे. परंतु नुसतीच ओरड करण्यापेक्षा डॉ. आर. आनंदकुमार यांच्यासारखे 'धाडस' अनेक लोकांनी आता दाखवायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाकडे जिव्हाळ्याचा विषय म्हणून आस्थेवाईक नजरेने पाहणा-यांनी तर पहिल्यांदा आनंदकुमार यांचा कित्ता गिरवायला हवा. त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. नुसत्या शिव्या घालून किंवा काठावर बसून बुडणा-या नावेची गम्मत पाहण्यात काय हशील आहे? हे आता सर्वानीच ध्यानात घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी योग्य वेळदेखील हीच आहे. सरकारी शाळांमध्ये शिकवणा-या शिक्षकांनीही आपली मुले आपल्याच शाळेत घातली पाहिजेत, म्हणजे मग गमावलेली विश्वासार्हता परत कमावता येईल. अशी मांडणी सतत गेल्या काही वर्षांपासून केली जातेय. पण हे केवळ शिक्षकांसाठीच का? १९६४-६६मध्ये शिक्षणाबाबत नेमलेल्या कोठारी आयोगाने कॉमन स्कूल सिस्टीमचा आग्रह धरला आहे. सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी आपली मुलं सरकारी शाळेत म्हणजे ते ज्या शाळेत शिकवितात त्या शाळेत घालावीत अशी मागणी करणे रास्त आहे. त्या मागणीचे स्वागत करताना आपण या गोष्टी सर्वांसाठी का लागू करीत नाही आहोत? म्हणजे मंत्रीगण, आमदार-खासदार, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर सर्वच समाज घटकांनी यात सामील झाले पाहिजे. असे झाले तर मुख्य म्हणजे सरकारी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी काही सकारात्मक,चांगल्या गोष्टी घडायला लागतील नाही तर एरवी होते असे की, याच कारणाने सरकारी शाळांतील शिक्षकांना शिव्याशाप देणारे लोक स्वतः पालक म्हणून बिनदिक्कतपणे शिक्षणाच्या दुकानात जाऊन शिक्षण विकत घेताहेत. आपली मुले कुठेतरी सी.बी.एस.ई.किंवा आय.सी.एस.ई.शाळेत पाठवितात. त्यासाठी घसघशीत रक्कमही मोजतात. गांधीजी म्हणत असत की, 'समाज सुधारावा असे जर का तुम्हाला वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी.' पण आपल्याकडे असे आहे की, मी सोडून इतरांनी काय करावे, हे अगदी सुंदर पद्धतीने सांगणारे मुखंड गल्लोगल्ली भेटतात. हे आपले दुर्दैव. 'एका कृतीचे महत्त्व शंभर विचारांहून श्रेष्ठ असते,' असे सुविचार आपण जगण्यात कधी उतरविणार, हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच आनंद्कुमार व्यवस्थेची काळजी वाहणा-या कृतीशून्य, वाचाळ पंडितांपेक्षा अधिक मोठे वाटू लागतात. आणि हो काही लोक बोंबा मारतात इतके काही सरकारी शाळांमधील शिक्षण कोसळलेले नाही बर. आज गरज आहे ती याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची. शिक्षकांशी विश्वासाने वागण्याची. कारण शेवटी असे आहे की, उपलब्ध असलेल्या याच मनुष्यबळाकडून आपल्याला जर का काम करून घ्यायचे आहे तर मग या वास्तवाला वळसा घालून पुढे जाता येत नाही. तसे झाले तर आपलीच आपण फसवणूक करून घेतल्यासारखे होईल.

आज समाजातल्या आर्थिक विषमतेचे प्रतिबिंब अपरिहार्यपणे शिक्षणातही उमटलेले दिसतेय. गरिबांनी 'गरीब' सरकारी शाळेत शिकायचे. श्रीमंत लोकांची मुले मात्र 'एज्युकेशन म्वाल'मध्ये जाणार... यातून अनेक सामाजिक साम्यान्चा जन्म झाला आहे, आणखीन होणार आहे. 'देशातल्या सरकारी शाळांमध्येच मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया वेगाने घडते आहे,' असे निरीक्षण प्रो.यशपाल यांनी नोंदविलेले आहे. हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.

आज सर्वच पालक मुलांच्या शिक्षणाबाबत अत्यंत जागरूक झाले आहेत. ग्रामीण भागातही कधी नव्हे इतके शिक्षणावर लक्ष केंद्रित झाले आहे. पण इंग्लिश शाळांचे खूळ अनेकांच्या डोक्यात घुसल्याने ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा पट यंदा चांगलाच घसरला आहे. हा धोक्याचा इशारा आहे. अन्यथा एक एक करून भविष्यात सरकारी शाळा बंद होत जातील आणि शिक्षणाची दुकाने दिवसेंदिवस आणखीणच वाढत जातील. ‘परवडले तर शिका’ .....अशी गरिबांची स्थिती होऊन जाईल. नाही तरी सरकार शिक्षणातून अंग काढू पहाते आहेच.

इंग्लीश माध्यमाच्या किंवा खासगी शाळा तेवढ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणा-या असतात, असा एक गोड गैरसमज ब-याच जणांचा झालेला दिसतो. नाही तरी सरकारी गोष्टी तुकार असा समज आपण पसरवला आहे. दुसरे म्हणजे हे फार शिक्षणशास्राला वगैरे धरून आहे, असेही नाही. उलट गावोगावचे जागरूक नागरिक आपली पोरे इंग्लिश मिडीयमच्या शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे गावातील सरकारी शाळांवर विधायक दबाव ठेवण्याची संधीही हे लोक आपणहून गमावून बसतात. हे चित्र बदलायचे असेल तर 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' मानून लोकांनी दु:ख व्यक्त करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा गोपिकाच्या वडिलांचा म्हणजे आनंद्कुमारांचा आदर्श समोर ठेऊन पुढे जायला हवे. त्यांचे केवळ कोरडे कौतुक करण्यापेक्षा अनुकरणदेखील केले पाहिजे. आपण सा-यांनीच 'एज्युकेशन कम्युनिटी' म्हणून याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अन्यथा आपल्याइतके करंटे आपणच ठरू. भविष्यकाळ आपल्याला कधीही माफ करणार नाही. म्हणूनच आपण हे 'धाडस' आता करायलाच हवे...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )