माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

होय, मी गुन्हेगार आहे..!

शिक्षण हक्क कायदा असं म्हणतोय की, १ली ते ५वीला शिकविणा-या शिक्षकांचे प्रत्यक्ष शिकवायचे (सरकारी भाषेत अध्यापनाचे) २०० दिवसांत ८०० तास आणि ६व्या ते ८व्या वर्गाला शिकविणा-या शिक्षकांचे २२० दिवस म्हणजेच १००० तास भरले पाहिजेत. कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरु झाल्याला आता दोन वर्षे पूर्ण होताहेत. कायदा आल्यावर शिक्षकांना जरासे हायसे वाटले होते. त्याचे कारण म्हणजे निदान आता तरी आपल्याला पूर्ण वेळ शिकवायला/शिकायला मिळेल, असे शिक्षकांना वाटले असावे. गेल्या दोन वर्षांत खरंच भरलेत का इतके दिवस, इतके तास? आज राज्यातल्या सरकारी काय किंवा खासगी शाळांतून काय चित्र दिसतेय?

न्यायालयाने सर्व अशैक्षणिक कामे काढून घेण्याचे आदेश देवूनही, आणि हो क्रांतिकारी कायदा म्हणून ज्याचा उठता-बसता उद्घोष केला जातोय, तो शिक्षण हक्क कायदा येऊनही यात काही एक फरक पडलेला नाहीये, असेच खेदाने म्हणायला लागते. प्रत्येक शिक्षकाला वर्षभरात किमान महिनाभर तरी (आशयहीन) प्रशिक्षणे घेणे, त्याचबरोबर खिचडी शिजवणे, गणवेष शिवून घेणे, आरोग्य तपासणी करणे, सतराशे साठ सर्वे करणे, निरनिराळ्या प्रकारचे अहवाल लिहिणे म्हणजे कारकुनी कामे, अधिका-यांच्या मीटिंग्ज अटेंड करणे, बांधकामे करणे, त्याच्या आढावा बैठकांना वेळोवेळी हजेरी लावणे, सरकारी कार्यशाळांना उपस्थित राहणे, यात किती वेळ गेला? याचा तपशीलवार हिशेब मी करत आहे. (लवकरच तो होईल.) पण यात जनगणना आणि निवडणुका धरलेल्या नाहीत बरं. आमच्या अकोले तालुक्यात प्रत्येक गावातील एका शिक्षकाला बूथ लेवल ऑफिसर (BLO) म्हणून नेमणुका दिल्यात. मतदार याद्यांचे नूतनीकरण आदी अनुषंगिक कामांचा समावेश आहे. त्यात जवळपास महिना गेला.

सांगा कसं शिकवायचं? आणि कधी शिकवायचं? आज राज्यातल्या शिक्षकांची आर्त हाक आहे की, आम्हाला मुलांसमोर राहुद्यात. शिकवूद्यात. पण छे, त्यांचं ऐकतंय कोण? त्यांच्या संघटनादेखील आधीच मोडून टाकल्यात की पडल्यात देव जाणे. आवाज उठवायला आहे कोण? सांगा ना? मीडीयादेखील त्यांच्या बाजूनं आहे कुठे? शिक्षकांच्या बदनामीकारक, नकारात्मक बातम्यांमध्ये 'प्रिंट'वाले 'वाचनीयता' नावाचे 'मूल्य' शोधत असतात, तर 'इलेक्ट्रॉनिक'वाले 'टीआरपी' शोधात हेच तुणतूणं वाजवताना दिसतात. या कळीच्या प्रश्नांना वाचा फोडणार कोण? शिक्षकांना चेपायचे केव्हा थांबविणार आपण?

प्रशिक्षणे तर उदंड झालीत... गेल्या महिनाभरापासून म्हणजे अख्खा मार्चभर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात निव्वळ 'प्रशिक्षणोत्सव' सुरु आहे! (आणि तो आलाय नेमका परीक्षांच्या तोंडावर! आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'मार्चएंडच्या' मोक्यावर!) चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षा असल्यामुळे वर्गात मुलांसमोर थांबण्याची मनात कितीही अनिवार ओढ असली तरी शिक्षक मुलांच्यासमोर उभे राहू शकलेले नाहीयेत. खरच सध्या प्रशिक्षणाच्या नावाखाली जे काही सुरु आहे ना, ते म्हणजे केवळ आणि केवळ अनुदाने खर्ची घालण्याचे उद्योग सुरु आहेत. काही म्हणजे काहीच होत नाहीये तिथे. बकवास सुरु आहे सारा. फक्त बकवास बस्स!

एखाद्या कैद्याला तुरुंगात कोंडतात किंवा डांबतात कारण काय की, त्याच्यावर काहीतरी गुन्हा केल्याचा आरोप असतो. येथे शिक्षकांनी ते शिक्षक झाल्याचाच गुन्हा केलाय जणू! म्हणूनच की काय त्यांना दिवसभर एका जागेवर स्थानबद्ध करून ठेवले जातेय. काहीही नवीन शिकायला न मिळता एका जागेवर निव्वळ रिकामे बसून राहणे किती त्रासदायक असते? हे अस्वस्थ करणारे वास्तव आहेच, पण त्याहून जास्त चीड आणणारा आणि संतापदायक प्रकारही आहे. मानवी हक्कांची जराशीही चाड नसणं म्हणजे काय तर याचं उदाहरण आहे प्रशिक्षणादरम्यान प्रशासकीय यंत्रणेचे शिक्षकांशी वागणं.

अन् आहे त्या वेळेतही काय तर शिक्षक म्हणजे गवंडी, आचारी, शिंपी, कारकून आणि डॉक्टर... मग जमलेच तर थोडाफार शिक्षक..! शिकायला येणारी लेकरं आणि शिक्षक यांच्यामध्ये मायबाप सरकार हाच 'अडसर' आहे. इतके शिक्षक या मुद्द्यावर अस्वस्थ आहेत की बस्स. त्याची गणतीच नाही. आठवीपर्यंत शिकविणार्‍या खासगी विद्यालयांतील शिक्षकांची परवड तर आणखीन वेगळीच आहे. सकाळी शाळेला जायचे, नंतर १०,१२वीच्या परीक्षेची सुपरविजन करायची तेथून पुढे प्रशिक्षणाला जायचे, १० वीचे पेपर तपासायला आलेले आहेतच आणखीन बोकांडी! आता बोला?

किती तरी शिक्षकांना शिकवायचेय. पण सरकारी यंत्रणा म्हणतेय की शिकवताय काय... ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग... 'मुकी बिचारी कुणीही हाका!' अशी एकुणात स्थिती! अत्यंत दयनीय, केविलवाणी. नंतर शिक्षकांच्या नावाने गळे काढायला सारे मोकळे. बघा दर्जा घसरला... कोणामुळे? तर अर्थातच शिक्षकांमुळे! शिक्षक कित्ती कामचुकार आहेत... त्यांना शिकवायचेच नाहीये... पगारापुरते उरलेत सारे... अशा बोंबा ठोकल्या जाणार. शिक्षणाच्या आईचा घो..!! यालाच म्हणतात ना !!! आज सरकारी शाळांतून जे काही बरंवाईट काम सुरु आहे ना. ते सरकारी यंत्रणेमुळे नाही. तर त्याचं श्रेय शिक्षकांनाच जातं.

समाज मात्र हे सगळं वास्तव निव्वळ बघतोय. समाजमन काय मुकं, बहिरं, आंधळं बनलंय की काय? कोणीच का काही बोलत नाहीये? शिक्षकांची विश्वासार्हता मावळलीय. हे मान्य. पण म्हणून व्यवस्थेविषयी आपण कोणीच ब्र का काढत नाहीये? शिक्षक नावाच्या द्रोपदीचे वस्रहरण पाहणा-या समाजाला या सगळ्याचा उलगडा होईल तेव्हा खूप उशीर झालेला असणार, हे निश्चित. एक दिवस याचा समाजाला पश्चाताप होणार. नक्की होणार. शिक्षणाच्या खासगी दुकानांत पैसे मोजून नीट शिकायला मिळणार नाही ना, तेव्हा सरकारी शाळांची आठवण सगळ्यांना होणार म्हणजे होणारच... समाज जर सरकारी शाळांची पडझड अशीच मुग गिळून पाहत बसला तर आधी उल्लेख केलेला तो दिवस पण फार दूर नाहीये.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी शाळेला असते सुट्टी. पण आम्ही शिक्षक सह्या करतो मस्टरवर. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला ८ दिवस खर्ची पडले, तरी त्याची नोंद मात्र शैक्षणिक गोष्टींच्या अध्यापनाच्या सदरात घेतली जाते. असे कितीतरी दिवस असतात. हे कोणी लक्षात घेणार नाही का कधी? बाकी इतर शैक्षणिक मूल्य नसलेल्या ढिगभर गोष्टी करता-करता शिकवायचेच राहून गेलेय हो. समोर बसलेली मुलं केविलवाणी झालेली असतात. शिक्षक काहीतरी कारकुनी करीत असतात. 'सर, शिकवा ना काहीतरी' असं आर्जव लेकरं करीत असतात. तेव्हा इतकी चीड येते या व्यवस्थेची काय सांगू?

या सगळ्यात शिक्षण हक्क कायदा म्हणतोय ना तितके दिवस, तितके शिक्षणाचे तास माझे शिकवायचे भरत नाहीत. माझ्या एका शिक्षक मित्राने तर अवघ्या ५६० तासांचा अंदाजे हिशेब केलाय! याबाबतचा सारा तपशील माझ्याकडे उपलब्ध आहे. कायद्याप्रमाणे जर ते भरत नसतील तर मी कायद्यानुसार करावयाच्या कारवाईला पात्र आहे. म्हणूनच मी असं म्हणतोय की, होय मी कायद्याचा गुन्हेगार आहे. माझ्यावर कारवाई करा की मग...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )