माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

हरिश्चंद्रगडावरील 'इंद्रवज्राचा' देखावा!!

पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही? होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता... संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे आणि इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून पुरते हरखून गेले। होय, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले होते अत्यंत देखणे आणि दुर्मिळ 'इंद्रवज्र' !

या इंद्र्वज्राची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.

नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर याची नोंद आपल्याला आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवलेय की, AcompanAccompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colours. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chaina tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes , description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या ५० ते ६० फुट होती. इंद्र्वज्राचे वैशिष्ट्यच असे की, जो हे दृश्य पाहातो; तो स्वत:लाच त्यात पाहातो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मधात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते.

इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की, निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी गडाच्या पाठारावर मात्र धुके नसेल पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मिळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग. मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करीत असतात. डॉ. बस्ते आणि तुषार शेवाळे यांना हे अद्भुतरम्य दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.

साईक्सनंतर इतक्या वर्षांनी २०११ मधल्या मे महिन्यात कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय आणि ते कॅमे-यात बंद केलेय... हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः नाचू लागले... एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात. पण ब-याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला. जैव-वैविध्याच्याबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणांपैकी एक असलेला. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; परंतु इथल्या कड्याला तोड नाही, म्हणजे यासम हाच असा..! येथील निसर्ग सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे..!

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )