माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

जुनं जुनं गेलं.... नवं नवं आलं....

कोणत्याही नव्या गोष्टींचे आगमन झालं की त्याची नवलाई मनाला मोहून टाकते. जुन्या गोष्टी अपोआप मागे पडतात. जुनं ते सोनं म्हणण्याइतकच त्याचं अस्तित्व उरतं. परंतु इतिहासाकडे कोणी दुर्लक्ष केल्याने इतिहास पुसला जात नाही, असं म्हणतात. सध्याच्या यंत्रयुगात विज्ञानाने किमयागाराप्रमाणे किमया करून दाखवलीय. अनेक गोष्टींबाबत 'जुनं जुनं गेलं दादा, नवं नवं आलं' असं म्हणायची वेळ आलीय.

तीन चाकाच्या रिक्षा आता टूरटूरत चालत आहेत त्यामुळे घोडागाडीचं चपळ घोडं फुरफुरायचं थांबलं आहे. ऑल्युमिनिअम, स्टीलनं आता तांब्या - पिताळाचं पितळ पुरतच उघडं पाडलंय! मिक्सरच्या घरघर आवाजात उषः काली कानावर येणा-या जात्यावरच्या ओव्या ऐकू येईनाशा झाल्यात. पाट्यावर फिरणा-या वरवंट्याला आता विसावा मिळताना दिसतोय. उखळ-मुसळही केरात हरवलंय. देव्हा-याच्या जागी न राहता देव आता आधुनिक घरात राहायला गेलेत. तिथे बाकीच्यांची काय कथा ? बटन दाबले की विजेच्या दिव्यांची वात लागते. नको तेल नको वात. हात जोडले की देवपूजा संपते. काही तसबिरींमध्येच दिवे आहेत. जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ म्हणून गणली जाणारी आमची भारतीय संस्कृती. कृषी आणि श्रमसंस्कृतीशी नाते सांगणारी. आपल्या देशातला शेती हाच मुख्य व्यवसाय असला तरी इतर छोटे-छोटे व्यवसाय करून पोट भरणारी अनेक लोक येथे होते. त्यांच्याही आता आपल्याला हळूहळू विसर पडू लागलाय. खेड्या - पाड्यात अवसा-पुनवेला या मंडळीचं अधूनमधून दर्शन घडते इतकेच. हे व्यवसाय आता विस्मृतीच्या वाटेने जाताहेत.

काही वर्षापूर्वी तांब्याची, पितळाची भांडी घरोघरी वापरली जायची. ठराविक दिवसांनतर त्या भांड्यांना कल्हई करावी लागे. कल्हईचा व्यवसाय करणारे लोकदेखील न चुकता वेळेवर यायचे, घरोघर फिरायचे. भांडे आतल्या बाजूनं कल्हई करून लख्खं व्हायचे. मृगातल्या पहिल्या पावसानंतर मातीचा जसा खरपूस वास दरवळतो तसा नवसागर - कथिलाचा वास दरवळायचा. आता मात्र स्टील आणि नॉनस्टिक भांड्यांचा जमान्यात कल्हईवाल्यांना अस्तित्वच उरलेलं नाही. आता तर तांब्या-पिताळाची भांडी भरपूर महागली आहेत.

डफ - तुणतुणे वाजवीत गोंधळी गीत म्हणून पैसे मागणारे गोंधळी विरळ झालेत. देवीला नवस करणारेही कमी झाले आहेत. शिक्षणामुळे माणूस बदलतो. अंधश्रद्धा जाऊन ज्ञानदायी श्रद्धा मनात वसते. पूर्वी कसरत करणारे डोंबारी आपल्या कुटुंबासहित गावात उतरायचे. कसरतीचे खेळ करून दाखवायचे. लोकांची मन जिंकायचे. एक - दोन वर्षाची पोरगी बांबूला बांधून उंचच उंच आकाशात गेली की, इकडे पाहणा-याच्या काळजाचे ठोके वाढायचे! कारण तो बांबू डोंबारी फक्त आपल्या दातावर तोलायचा. तारेवर चालण्याची कसरत. विविध उड्या मारणे असे प्रकार डोंबारी करून दाखवायचा. बघणारे श्वास रोखून हे सारे पहात बसायचे.

छोटीशी सर्कस गावात यायची. एडक्याशी टक्कर घेणा-या संपत पैलवानाला पहायला तोबा गर्दी व्हायची. दरवेशी आगडबंब अस्वल घेऊन यायचा आणि गावातली रिकामटेकडी मंडळी, पोरं- टोर अस्वलामागे हिंडायचे. मात्र कुणीतरी सांगितले असायचे की, अस्वल गुदगुल्या करते म्हणून सगळेजण चार फुट दुरून गंमत पहायचे. पाठीवर कडाडकन आसुडाचे फटके ओढत पोतराज आणि कडक लक्ष्मीचं सोंग कधीतरी गावात यायचं.त्याला आमच्याकड म-या आईचा डोलारा आला, असे आम्ही पोर म्हणत असू. बालगोपाळ कडाक्यापासून सुरक्षित अंतरावर असायचे. मोरपिसांची सुंदरशी उंच टोपी घालून टिल्लम- टिल्लम टाळ वाजवत वासुदेवाची स्वारी यायची. अंगावरच्या अंगरख्याच्या कवड्यादेखील मोठ्या लक्षवेधक असायच्या! आता वासुदेव येतच नाही. टाळही वाजत नाही. तो कुठे तरी हरवलाय .

माकडवाला माकडांना घेऊन आला की, डमरुचा आवाज येतो न येतो तोच भोवताली पोरं जमायची. खेळ मोठा मनोरंजक असायचा. खेळाला एकच एक तीच ती कथा असायची ! ती सर्वश्रुत असायची. तरीही गर्दी व्हायचीच. दोन माकडांपैकी पहिला देवजी लढाईला निघायचा. मग भागुबाई रुसून बसायची ! थोडावेळ रुसवा फुगवी चालायची. मग देवजी भागुला साडी - चोळी आणायचा. बालगोपाळांना मोठी गंमत वाटायची आणि आश्चर्यही वाटायचे. दरम्यान त्या माकडाचे वेडे चाळे सुरु व्हायचे. वाकुल्या दाखवणं. अंग खाजवणं. वाकरून पाहणं. लोकांनी टाकलेले पैसे मालकाजवळ नेऊन देणं. हे सगळ बघायला मजा यायची. पण हल्ली माकडवालाही दिसत नाही. आला तरी त्याला पाहायला लोकांनाही निवांतपणा उरला नाही.

पूर्वी हजामत करायला न्हावी दादा घरी यायचा. घेरदार शेंडी ठेवून हजामत करताना न्हावीदादाचं कौशल्य दिसत असे. आता पुरुषांच्या बरोबरीने बायकाही सलूनमध्ये ब्युटी पार्लरमध्ये जाऊ लागल्यात. स्वतःला आरशात पाहायला आवडतं, तसच माणसाचं भविष्याच्या बाबतीतही आहे. वर्तमानपत्र हातात पडलं की बरेचजण भविष्याच्या पानावरून वाचायला सुरुवात करतात. ज्योतिषी मंडळी भविष्य सांगणं, पत्रिका बघणं, कुंडल्या काढणं, मुहूर्त काढून देणं अशी कामं करत असायची. परंतु ही मंडळी कधीही सोप्या भाषेत बोलत नसायची! शनि - गुरुची युती, हर्षलाचा - मंगळाशी अशुभ दृष्टीकोन, महादशा ,राहू-केतू वगैरे काहीबाही बोलत असायची. कोणाला काही कळत नसे. पण देव बाप्पा सांगताहेत मग बरोब्बर! असा एकूणच मामला.गणेशोत्सवाच्या काळात मंत्रपुष्पाजलीसाठी आजच्या युगात त्यांची जागा कॅसेट, सीडीज यांनी घेतली. पूर्वीच्या काळी अंगावर ठिकठिकाणी गोंदून घेतले जायचं. गोंदणा-या बायका गावोगाव हिंडायच्या. जत्रेत तर हमखास भेटायच्या. हल्लीची मुलं स्टिकर्स लावतात. ती काढता येतात. परंतु एकदा गोंदल की ते आयुष्यभराच व्हायचं. मग ते कपाळावर,हातावर. त्याची शैलीही वेगळीच असे.

नागोबाला घेऊन गारुडी यायचा. पुंगी वाजवून नागाला नाचवायचा. नागही भलामोठा फणा काढून नाचायचा. बुगुबुगु करत नंदिवाल्याचा बैल यायचा आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची हो - नाही अशी मान हलवून उत्तर द्यायचा. नंदीबैलाचा वेश मात्र भारी असायचा. पाठीवर झूल. गळ्यात घंटा घुंगरमाळा. रंगीबेरंगी शिंगे. बांगड्यावाला कासार बांगड्या भरायला वणवण करत खेड्या पाड्यात फिरायचा. पावसाळ्यात छत्री दुरुस्तीवाला नेमानं यायचा. भजनी-भारुड मंडळही गावागावात फिरायची. गावातला जागल्या कधीच हरवलाय. असे अनेकविध कलात्मक व्यवसाय करत टीचभर पोटाची खळगी भरत माणसं जगायची. ज्याचं त्याचं एक वेगळेपण असायचं आज हे गाव तर उद्या दुसरे अशी भटकंती चालायची. कधी कधी असे वाटते की लहानपणी प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या या कलात्मक व्यावसायिकांच्या फक्त स्मृतीच शिल्लक राहतील काय? याची रुखरुख मात्र मनाला वाटत राहते.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )