माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

रात्रीच्या काळोखात उमलली लक्ष लक्ष प्रकाशफुले!

भंडारदर्‍याचा काजवा महोत्सव

काजवा महोत्सव

लक्ष लक्ष काजवे...नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला आले आहे...! आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सुरु आहे... आपण निशब्द...कल्पना करा... काय अदभूत देखावा दिसत असेल ना हा..!

दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो. आणि सूरही आहे. पण त्यांची भाषा अवगत नसल्याने हे सारे आपल्याला ऐकू येत नसावे. जणू काही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवनगाणे गाताहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातेय. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात स्वत:ला हरवून बसतो.

ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाश फुले मुक्त हस्ते उधळीत असल्याचा विचार मनात चमकून जातो. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदणं झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे, हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे पाहताना मग काळोखाची, हिंस्र स्वापदांची, सरपटणा-या प्राण्यांची मनाला एरवी वाटणारी भीती कुठल्या कुठे पळून गेलेली असते.

काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणार-या, बागडणा-या या 'अग्निसख्याला' दोन मोठे डोळे असतात. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरु होते. सुरुवातीला त्यांची संख्या नगण्य असते. म्हणजे पुढे जून महिन्याच्या मध्यापर्यंत तर त्यांच्या संख्येत भूमिती पद्धतीने वाढ होत प्रचंड मोठी भर पडते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. तेव्हा तर या भागातील या अनोख्या काजवा महोत्सवाचा तर ख-या अर्थाने 'क्लायमॅक्स' होतो!

अंडी, अळी, कोश असा जीवनप्रवास करणा-या काजव्याच्या अळीचे दोन आठवड्यांत प्रौढावस्थेत रुपांतर होते. काजवा निशाचर आहे. म्हणूनच तो रजनीसखाही आहे. जगभरात काजव्यांच्या जवळपास दोन हजार जाती आहेत. 'कोलिओऑप्टेरो' नावाच्या भुंग्याच्या कुळात काजव्यांचा समावेश केला जातो. अळीतून प्रौढावस्थेत जातो तेव्हा काजवा स्वयंप्रकाशी बनतो. त्यांची लांबी दोन ते अडीच सेंटीमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या किटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. तुलनेने माद्या काहीशा सुस्त असतात. मऊ, मृदुकाय खाद्य काजव्यांना आवडते किंवा चालते. तर बेडूक, कोळी यासह काही पक्ष्यांचे काजवे हे खाद्य आहे. निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराचे रंगांचे काजवे दिसून येतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा असे रंग काजवे उधळतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग ५१० ते ६७० नॅनोमीटर असतो.

मे-जून महिन्याचे हे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असल्याचे अभ्यासक सांगतात. आपल्या जोडी दाराला आकर्षित करण्यासाठी हा कीटक चमचम करीत असतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचे जीवनचक्र थांबते. काजव्यांची ही वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरुपाची वर्दी देतात, असे स्थानिक आदिवासी मानतात. मोसमी पाऊस दाखल झाला की, पुढे तो चांगलाच जोर धरतो, नंतर त्याचे रौद्र तांडव सुरु होते. या रपाट्या पावसामुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते... तशी ही मयसभादेखील संपून जाते. जगभरातल्या जीवशास्राच्या अभ्यासकांपेक्षा या काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी यांनाच जास्त भुरळ घातल्याचे दिसते. जेम्स रिल या सुप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकाने 'रात्रीच्या मातीत पेरलेल्या सोनबीया...' असे काजव्यांचे मोठे चपखल शब्दांत वर्णन केलेय. मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांनी काजव्याचा मंद प्रकाश उगीच सतावतोय, अशी लाडीक तक्रार एका कवितेत केलीय. 'अंधारच मज हवा, काजवा उगा दाखवतो दिवा' असे ते लिहून जातात. भंडारदरा परिसरातील रमणीय निसर्गातील अनोख्या जलोत्सवापूर्वीचा मनाला मोहिनी घालणारा काजवा महोत्सव आवर्जून पाहावा, एकदा तरी अनुभवावा असाच...

कोणती काळजी घ्याल?

काजवे पाहताना आपले भान हरपून बसतो. म्हणूनच काही खबरदारी घेण्याची आवश्यकता असते. रात्रीच्या काळोखात काजवे पाहताना शक्यतो रस्त्यावर उभे राहूनच हे दृश्य पाहावे. योग्य ती खबरदारी घेत, रस्त्यावरून पायी फिरत या दुनियेची मस्त सैर करण्यात खरा आनंद आहे. पण जंगलात आत आत घुसू नये. कोणतीही आगळीक करू नये. पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्याने एखादा पाऊस झाला की, बिळात पाणी घुसल्याने साप बिळाबाहेर येतात. याबाबत अधिक दक्ष असावे. काजवे पाहताना एकाच झाडाकडे एकटक पहात राहावे. अंधारी रात्र असेल तर काजवे पाहताना खूप मज्जा येते...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )