माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

कठ्याच्या यात्रेतला धगधगता थरार

कठे यात्रा, तालुका अकोले

आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आपले नैसर्गिक जीवन आणि प्रसन्न मन त्या संस्कृतीच्या हवाली केले आहे. त्याचे काही बरे-वाईट परिणामही आज आपण भोगतो आहोत. मात्र, सह्याद्रीतील गिरीकंदरांत राहणारा आदिवासी समाज अजूनही त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांना चिकटून आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, वहिवाट इत्यादींशी एकरूप झाल्याचे दिसून येते. जीवनात आनंदी राहण्याचा मंत्रच जणू या लोकसंस्कृतीने, परंपरेने आदिवासींना बहाल केला आहे. दरवर्षी चैत्र, वैशाखाच्या सुमारास हे लोक रिकामे होतात. गावांच्या सामुदायिक जत्रांचा तो हंगाम असतो. आदिवासी समाजाची धार्मिकता आणि श्रद्धा यातून दिसते. याशिवाय आदिवासींच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे मनोज्ञ दर्शनही यातून घडते. अत्यंत तन्मयतेने आणि उत्साहाने हे लोक यात सहभागी होतात.

कौठवाडी. अकोले तालुक्यातील असेच एक दुर्गम आदिवासी खेडे. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे विठोबाची मोठी यात्रा भरते. कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली. पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे तोबा गर्दी करतात. खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत. पण येथी म्हणजे कौठवाडीत त्याचा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो. येथील बिरोबाच्या देवस्थानची आख्यायिकाही मोठी मजेशीर आहे.

पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी-पाचघरचे धनगर लोकं कधी काळी मेंढ्या चारीत चारीत या भागात आले.एका मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचलेना. मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पुजेअर्चेसाठी तेथेच ठेवले. बाकी मंडळी गावी परतली. येथील देवस्थान तेव्हापासूनचे! आद्य पूजा-यांची नावे भोईर. म्हणून आजही पूजेचा मान गावातील भोईरांना मिळतो. पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. गावक-यांनी त्याचा अलिकडेच जीर्णोद्धार केलाय. सध्या येथे सभामंडपासह टुमदार मंदिर उभे आहे. चोहोबाजूने सह्य पर्वताच्या डोंगररांगेनं वेढलेल्या कौठवाडीला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेय.

येथील यात्रेचे वैशिष्टय म्हणजे पेटलेले कठे डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या चौथ-याभोवती फे-या मारत असतात. प्रत्येक फेरीगणिक किलो किलोने तेल भाविक मंडळी उत असतात. तापलेले हे तेल कठ्यांतून खाली ओघळते. ज्वालांनी लालबुंद झालेल्या आतील निखा-याने किंवा तप्त तेलाने भाविकांना इजा होत नाही असं समज परंपरेने चालत आलाय. तसे झाल्याचे दिसून आलेले नाही. एरवी निखार्‍याजवळ हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो, या पार्श्वभूमीवर येथील हे दृश्य बघणा-याला काहीसे चक्रावून टाकते. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे.

'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणा-या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रान चाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात. सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण यात तेल ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात. दर वर्षी यात्रेत ३५-४० कठे असतात. एकाच वेळी ते चेतवले जातात. ज्यांच्या अंगात बिरोबा 'संचारतो' असे भक्तगण कठा डोईवर घेवून मिरवतात.

डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध चीत्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... मात्र फे-यांमागून फे-या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते... कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहातात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होवून जातात...

आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत रहातात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते...तो वाद्यांचा नाद कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी पाहावी...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )