माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

केवळ माझा सह्यकडा...

'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा...' असं महाराष्ट्राच्या भूमीचं वर्णन केलं जातं. आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे उत्तुंग पर्वतमाथे, डोंगर-सुळके, उरात धडकी भरविणा-या खोल-खोल द-या, उभे तुटलेले ताशीव, अक्राळविक्राळ कोकणकडे... जैववैविध्यानं समृद्ध वनसंपदा, ऋतूमानाप्रमाणे रंग-रूप धारण करणारा इथला निसर्ग... वर्षाऋतूत सह्यगिरीच्या कुशीत थबथबणारा अनोखा जलोत्सव...टपो-या थेंबांनी कोसळणारा पाऊस.. आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात... उताराच्या दिशेने खळाळत जाणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... दुथडी भरून वाहणा-या नद्या... उनाड रानवारा...सृष्टीच्या कानात कुजबुजणारे दाट धुके आणि जोडीला मस्त गारवा... पावसाळा संपतो न संपतो तोच सह्याद्रीच्या पठारांवर, डोंगरउतारांवर बहरतो नयनमनोहर पुष्पोत्सव... अनेकविध रंग, रूप, आकार घेऊन भेटीला आलेली मनाला वेड लावणारी त्यातली इवलाली नाजूक रानफुले... त्यांचा तो भारून टाकणारा गंध...

निसर्गाच्या या अभिजात सौंदर्याबरोबरच या भूमीला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. सह्याद्रीच्या कुशीत आजही मोठ्या दिमाखाने उभे असलेले गड-किल्ले... वास्तूवैभव आणि शिल्पकलेने नटलेली प्राचीनतम मंदिरे याचीच साक्ष देतात. निसर्गासोबत राहणारे येथील आदिवासी, त्यांचे लोकजीवन, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा...आधुनिक तीर्थक्षेत्रे म्हणून गणली जाणारी लहानमोठी धरणे, जलविद्युत, पवनऊर्जा यासारखे प्रकल्प येथील डोंगरद-यात, पठारांवर आकाराला आले आहेत. महाराष्ट्रात दिसणारं हे सारं वैभव आमच्या अकोले तालुक्यातही पाहायला मिळते. 'सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...' अशी अवस्था होऊन जाते.

सह्यगिरीच्या कुशीत मनमुराद भटकंती करताना जीवाला वेड लावणारं हे सौंदर्य डोळे भरून पाहिलं. अगदी जवळून अनुभवलं. कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न केला. हे सारं आणखीन कोणाला तरी सांगण्याच्या उर्मीतून ही वेबसाईट आकार घेते आहे. मला मिळाला तसाच अपूर्व आणि अवर्णनीय आनंद ही साईट पाहताना आणि मग प्रत्यक्षात भटकंती करताना तुम्हालाही मिळेल, खचितच! हा सारा प्रपंच यासाठीच...

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )