माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

बरं झालं तवा मीडिया तिथं फिरकला नाय!

मी काही कवी-बीवी नाहीये. हे ललित गद्य उर्फ कविता म्हणजे माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. कुठे अन्याय, अत्याचार, बेकारी, गरिबी, हाल-अपेष्टा, व्यथा, वेदना, भूक, दुष्काळ असे काही आता शिल्लक राहिलेलेच नाही. जणू काही समाजासमोरील सारेच्या सारे प्रश्न संपले आहेत... मग तेथून पुढे ह्यांची पत्रकारिता सुरु होतेय! नको ते विषय रंगवून रंगवून सांगितले जाताहेत. दु:ख काय करता? ते सारे विसरा हो. उत्सवी जगा. एक वेळ तुम्ही जेवण केले नाही तरी चालेल. मोबाईल घ्या मोबाईल, गाणे ऐका...हेड फोन लावून. त्याच्या तालावर नाचा,झुला. डिशवर सिनेमे,सिरिअल्स पाहात रहा...सुखी व्हाल. असेच तर जणू ह्यांना सांगायचे आहे..! या सबंध कोलाहलात लोकांच्या जगण्याचे प्रश्न अपोआप मागे पडताहेत. माध्यमांनी लोकांच्या जगण्याला भिडणारे अन्न, वस्र, निवारा यासह शेती, हवा, पाणी, आरोग्य, शिक्षण आदि प्रश्न हातात घेण्यापेक्षा अशी बदमाशी सुरु केलीय. सरकारचे अपयश समोर आणताना सामान्य माणसांची 'वकिली' करण्यापेक्षा मीडिया चेकाळल्यासारखा वागताना दिसतो आहे. 'टी.आर.पी.'साठी सुरु असणारे असे हे सेलिब्रेशन किती दिवस पाहत राहायचे? चौथ्या खांबाचे असे हे कोसळणे म्हणा किंवा समाजाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांपासून अशी फारकत घेणे. हे आपल्या लोकशाही राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. लोकांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नसलेला मीडिया अधिकाधिक प्रभावशाली होणे, परवडणारे नाही. 'खाउजा' नंतर मार्केट फोर्सेस कसे आणि काय प्रकारे काम करीत आहेत हे यातून दिसतेय.

मग तिथून पुढे कोणाचे बाळंतपण, कोणाचे महाशतक... अशी एकूणच 'पेज थ्री ' म्हणता येईल, अशी पत्रकारिता नसत्या भानगडीवर 'फोकस' करू लागते. लोकांना माध्यमांची ही 'गरिबी' लक्षात येईपर्यंत आपले खूप नुकसान झालेले असेल... आपल्या गरीब लोकांच्या या 'श्रीमंत' देशात हे असे 'फील गुड' केवळ पाहात राहण्यापलिकडे आपण काही करूही शकत नाही म्हणा. पण म्हणून आपण गप्पा बसून ह्यांना आणखीन रान मोकळे मिळेल. आपण बोलत राहिले पाहिजे, बोंबा मारीत राहिले पाहिजे. या हेतूने हे 'काव्य' सुचले.

बरं झालं तवा मीडिया तिथं फिरकला नाय !

 
        अहो, ऐकलंत का?
       ऐश्वर्या प्रेग्नंट आहे...!
       न्यूज, स्टो-यांचे डोहाळे लागलेत म्हणे ..!!
      कधी होणार डीलीव्हरी ?
      काय होणार? मुलगा की मुलगी ?
      इतक्यात थडकली एक ब्रेकिंग न्यूज-
      'ऐश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट '
      'बिग बी'चे ट्विटरवर ट्विट...
      मग त्याची झाली मोठ्ठी ब्रेकिंग न्यूज !
      मुलगी झाली हो... मुलगी !
      गोरीगोमटी... रुपानं देखणी...!!
      कोण-कोण तर काय म्हणे-
      फोटो दाखवा फोटो !!!
      ट्विटरवर, फेसबुकवर ... कुठे तरी दाखवा...
      कशी काय दिसतेय ती, आम्हाला बघुद्यात...
      आता काय तर म्हणे- नाव सुचवा नाव !
      ' ए ' वरून म्हणालेत ज्योतिषीबुवा !
      
      मपली माय कवा गर्भार व्हती?
      छे... तिची खबर त कंच्या ना-यानं दिली नाय...
      तिचा फोटू बी नव्हता एखाद्या नटीवाणी
           'ह्यांना' पेपरात छापण्याजोगा...
           ढेकळात ढोरासारखं राबून रापलेली तिची चामडी...
           डीक्टो पंढरीच्या विठुरायावाणी
          माह्या बारीला त दिस उगवल्यापासून तिला कळा सुरु झाल्त्या
          आख्ख शेत नांगरून झाल्यावं मग बापानं गाडी जुपली,
          तवा पार तिसरा पहार झाला व्हता
          खटारगाडीतून जाताना पांणदितच माय बाळंत झाली.
          तशी गाडी माघारी फिरली.
      
      घरी आल्याव सारी चिलीपिली तिच्या भवतानी जमली
       नेमका याच टायमाला मावाला बाप
       कंच्या तरी आजारानं एकाएकी आंथूरणाला खिळला व्ह्ता
      नात्या-गोत्याचे लोकं दोन दिसांचे हो,
      शेतीवाडी, गुरं-ढोरं, पोरं-सोरं परपंच कसा अपांगायचा?
      मोठ्ठा परेश्न तिच्यापुढं 'आ' वासून उभा व्हता...
      मग मोठ्या हिमतीनं तिनं कंबर कसली
      
      तिस-या दिशी म्हण तिनं जात्याव बसून दळण दळलं
      वल्ल्या बाळातनीनं भाक-या कश्या थापल्या असतील?
      पाट्याव बसून मिरची बी कशी वाटली असंल?
      आई व्हाच सुख का काय म्हणत्यात ते तिला कुडं मिळालं कवा ?
      खाची-प्याची म्हंजी गुळ-खोब-याची चंगळ
      मपल्या मायला परवडणारीच नव्हती.
      घाटा- घुग-या खाऊनशान कसंबसं तिनं पेटं इथव आणलं व्हतं...
      पाचव्या दिशी माय शेतात खुरपायला बी गेल्ती
      त्याच दिशी रातच्याला आया-बाया आलत्या पाची पुजायला 
      बारसं कशाला म्हणत्यात?
      मायची शप्पथ, मला खरंच ठाव नाय 
      माह्या जल्माचं तवा कोणाला व्हतं कौतुक?
      आमी जलामलो कवा, वाढलो कसं?
      पोरं म्हनं तवा देवच देत व्हता...
      
      माह्या येळंला मायची बाळातपणाची नववी खेप व्हती
      मावाला थोरला भाऊ पाण्यात बुडून देवाघरी गेला.
      त्याला तसं बघून माय माही येडीपिसी झाली
      पाठीवरचं तान्ह लेकरुं तवा झोळीतच गुदमरून मेलं.
      नंतरच्याला त असं झालं-
      तिस-या खेपला तिचं बाळ जलमलं तवाच ते जितं नव्हतं
      मायेना माह्या तवा क्यावढा हांबरडा फोडला म्हनं
      बरं झालं तवा मीडिया तिथं फिरकला नाय!!!
      
      मला आता समजलं हाय -
      मोठ्यांच्या घरी पोरं जलमल्याची बी बातमी व्हती!
      गरिबाची पोरंसोरं मेली की त्याची माती...
      
blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )