माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

मुलांशी दिलखुलास गप्पा

आमच्या शाळेला भेट द्यायला अनेक लोकं येतात. शिक्षक, पालक, कार्यकर्ते येतात. परवा एका मोठ्या शाळेचे विद्यार्थी आले होते. ६० विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक. सहाव्या ईयत्तेतील हे सारे विद्यार्थी. शाळेचा शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा. शाळा इंग्रजी माध्यमाची. तिथले सारे हायफाय. खरं तर तिथल्या शिक्षकांनी आम्हाला अशा भेटीविषयी पहिल्यांदा विचारलं तेव्हा आम्हा शिक्षकांवरच दडपण आलं. गंगा तेल्याच्या घरी राजा भोज! पण म्हटलं चला या निमित्ताने तरी शहरातील मुलांचा खेड्यातील मुलांशी संवाद होईल. देवाणघेवाण होईल. आम्हाला, आमच्या मुलांना शिकायला मिळेल. शाळेत येऊन नेमके काय पाहायचे, काय दाखवायचे? याबाबत मात्र नेमकं काही ठरलेलं नव्हतं.

एका कोप-यातलं आमचं आदिवासी खेडं. बहिरवाडी. या लहानशा खेड्यातली जिल्हा परिषदेची आमची शाळा. शाळा आणि शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कुवतीनुसार करीत आहोत. म्हणजे असं की, आदिवासी मुलांना शिकविताना त्यांचीच भाषा वापरून, त्यांच्या भावविश्वाला साद घालणा-या फुलवणाऱ्या परिसर भेटी, निसर्ग सहली, क्षेत्रभेटी, शिवारफे-या यांचा उपयोग करून मुलांची शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी कशी होईल असा प्रयत्न असतो. मुलांचे मित्र बनून त्यांचे शिकणे पुढे नेत असतो. दुसरीकडे संगणक, इंटरनेट, डीजीटल क्लास या माध्यमातून हे तंत्रज्ञान मुलांपर्यंत आम्ही पोचविण्याचा प्रयत्न असतो. अद्यापही आमचा हा प्रयत्नच आहे. तरी पण सुरुवात निदान आमची आम्हाला तरी बरी वाटतेय. अर्थातच शाळा जिल्हा परिषदेची आहे, याची 'जाणीव' आम्हाला सतत कोणी ना कोणी करुन देत असते, पण 'मर्यादित' परीघातले जास्तीत जास्त स्वातंत्र्य आम्ही घेत असतो...

तर तिकडच्या शाळेतील मुलांबाबत सांगत होतो.ती मुलं आमच्या शाळेत आली. आल्या आल्या वर्गातल्या मुलांशी बोलायला लागली. आम्ही म्हटले मारुद्यात गप्पा. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकत असली तरीही बहुतेक मुलांची मातृभाषा मराठीच होती. त्यामुळे ती मराठीतच बोलत होती. थोडाच वेळ ती मुले आमच्या मुलांशी बोलू शकली. नंतर आपसांत बोलू लागली. त्यामुळे एकच गलका सुरु झाला.

मग मात्र मला 'मध्यस्थी'ची गरज वाटल्याने मी तसे करू लागलो. विविध गमतीजमती, अनौपचारिक गप्पा यांना चालना देण्याचा प्रयत्न मी करीत होतो.संवाद घडावा म्हणून सारी धडपड सुरु होती. परंतु काही केल्या त्या मुलांना मला सहभागी करून घेता येईना. त्यांचे आपसांतील बोलणे थांबवणे मला काही जमेना. इतकेच नाही तर 'प्लीज कीप सायलेन्स'चा त्यांच्या टीचरचा लाडका आदेशही ती मुले काही मानेनात. औपचारिक बोलण्यात सहभागी होण्यापेक्षा मुले आपसात इतके बोलत होती की, बस्स. बरे शाळा प्रयोगशील आणि मुलांना हसत-खेळत शिकविणारी असा लौकिक असलेली. त्यामुळे टीचरला मुलांवर डोळे वटारता येईनात...की कुणाला धमकावताही येईना!

निसर्ग, पर्यावरण, शेती, शेतकरी, शेतातली पिके, शेतावर काम करणारी माणसे, त्यांचे रोजचे जगणे यावर मी संवाद करू इच्छित होतो. परंतु मला ते काही जमेना. प्रतिसाद मिळेना. म्हणजे मलाच सूर सापडेना.शेवटी विषय बदलला. आणि वाचनावर म्हणजे अवांतर वाचनावर बोलू लागलो. मागच्या आठवड्यात काय काय वाचले? गोष्टी, कविता, वर्तमानपत्र काही पण वाचले असेल ते सांगा... पाहतो तर काय! आता ही मुले एकमेकांचे नाव सुचवायला लागली! आता मात्र त्यांच्या टीचर रागावल्या. 'डोन्ट सजेस्ट द नेमस्' असे बजावले. आमच्या शाळेतील चार-सहा मुलांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी आपापल्या पद्धतीने काही ना काही सांगितले. मात्र आतापर्यंत अविरत बडबड करणारी ही मुलं 'बोला' असं सांगितल्यावर बोलायचीच बंद झाली..! मला हे जरा विचित्रच वाटले. असे का होते आहे? प्रश्न विचारल्यावर गप्पा बसण्याचा संबंध विचार न करण्याच्या प्रवृत्तीशी असतो, असं म्हणतात. मातृभाषेऐवजी इंग्रजीतून शिकत असल्यामुळे यांची विचार करण्याची ताकद क्षीण झाली असेल काय? की 'स्पीक आउट'ऐवजी 'कीप सायलेन्स'मुळे असे होत असेल? हे 'लॅक ऑफ थिंकिंग' मला छळायला लागते. मी गोंधळात पडलोय.

इतक्यात एका मुलाने दुस-या मुलाच्या तोंडात मारली. मला कसेसेच झाले. मी म्हणालो "अरे! अशी मारामारी काय करताय? तुझा मित्र ना तो?" त्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो मारणारा म्हणतो कसा... "नो नो, ही इज् नॉट माय फ्रेंड, ही इज माय एनेमी." क्षणभर काय बोलावे तेच मला सुचेना. त्यांच्या मारामारीवरून मुलांचे लक्ष उडविण्यासाठी मी विचारले "तुम्ही टी.व्ही.बघता?" 'होऽऽऽ' एका सुरात सर्वांचे सामुदायिक उत्तर. "कोणकोणते चॅनल बघता?' माझा पुढचा प्रश्न. 'कार्टून नेटवर्क, 'डब्लूडब्लूएफ', 'डीस्कव्हरी', स्पोर्ट्स चॅनल... आणखीन काही नावे त्यांच्याकडून आली... "कोणता चॅनल जास्त आवडतो?" मी जिज्ञासेने विचारले. "कार्टून नेटवर्क!" पुन्हा एकदा एका सुरात सर्वांचे उत्तर. 'कार्टून नेटवर्क' म्हणजे येथे बहुतांश मारामारिचीच दृश्ये! मनात आले असली मारामारीची दृश्ये बघून मुले मारामा-याच करणार ना..! त्यांच्यात शत्रूत्त्वाचेच अंश रुजणारच ना..! आणि आम्ही याचे खापर मात्र शाळा आणि शिक्षकांच्या माथ्यावर फोडणार!

आता मी गाड्यांच्या विषयाकडे वळलो. "तुमच्या पैकी किती जणांच्या घरी फोर व्हीलर गाड्या आहेत?" बहुतेकांचे हात वर. अपवाद केवळ आठ-दहा मुलांचा. "गाड्यांच्या मॉडेल्सची नावे सांगू शकता? माझा पुढचा प्रश्न. मुलांनी फटाफट नावे सांगितली. पण "मारुती, अल्टो, झेन या गाड्या आता डबडा झाल्याय. माझ्या पप्पांनी फोर्डचे लेटेस्ट मॉडेल बुक केलेय." एका मुलाचा इंस्टन्ट रिप्लाय. या उत्तराने माझी बोलती बंद व्हायची वेळ! अर्थात आमच्या शाळेतील मुलांना हे प्रश्न त्यांची उत्तरे हे सारेच नवीन होते. समोरच बसलेला देवळा पथवे तर थेट तामकड्याखालून चालत येतो. ओढे ओलांडत...काट्याकुटयाची रानवाट तुडवत...साधी चप्पल पण नाही त्याच्या पायात! अनवाणीच येतो तो! किती दिवसांचा पाहतोय त्याला! त्याला काय माहीत गाड्या आणि त्यांची मॉडेल्सची!

हे सणवार कसे साजरे करतात, म्हणून विचारले तर मेल, मेसेज टाकले, ई-ग्रीटिंग पाठवले की बस्स! शुभेच्छा हमखास पोचतातच. दिवाळीत तर हजार-पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत फटाके उडविणारी मुळले भेटली.आमच्या शाळेतील मुले 'फटाकेमुक्त' दिवाळी साजरी करतात, हे त्यांना सांगूनही पटेना! मग आमच्या शाळेतील सहावीतल्या एका मुलीने अशी दिवाळी साजरी करण्यामागील भूमिकाच सांगितली. एक गोष्ट अजून. पाचव्या-सहाव्या वर्गाच्या पुढे ही मुले शाळेतील प्रकल्पांसाठी इंटरनेटचा बऱ्यापैकी वापर करू लागलीत. आई वडीलांच्या उपस्थिती ठीक. पण ते अनुपस्थित असताना ? पुन्हा शिक्षक अस्वस्थ होतो माझ्यातला.

विषय बदलावा म्हणून मी सहजपणे त्यांना प्रश्न टाकला, "गरीब कोणाला म्हणायचे?" "ज्यांच्याकडे सोने-नाणे, पैसे, गाडी, बंगला नाहीत... अशा लोकांना गरीब म्हणायचे..! बहुतेकांकडून अशाच आशयाचे उत्तर आले. तर दोन वेळचे पुरेसे जेवण न मिळणे, औषधासाठी पैसे नसणे, अन्न, वस्र, निवारा याची अभावग्रस्तता असणारा 'नाही रे' घटक या मुलांच्या गावीही नसणे, या बाबी मला शिक्षक म्हणून अस्वथ करून गेल्या. पंचेचाळीस वर्षांपूर्वी कोठारी आयोगाला याची चाहूल लागली होती. कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीचा त्यांना विसर पडलेला नसावा. कृष्ण-सुदामा हे दोघे एके काळी शाळेतले मित्र होते. आता कृष्ण महागड्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकत आहे, तर सुदामा जिल्हा परिषद ,नगरपालिकेच्या कुठल्या तरी शाळेत! त्यामुळे कृष्ण-सुदाम्याची आज भेट सोडाच; साधी ओळखदेखील होत नाहीये. तर सुदाम्याचे पोहे आजचा कृष्ण कुठले खाणार? कोठारी आयोगाने 'कॉमन स्कूल सिस्टीम'चा आग्रह धरला होता. तर मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया भारतातल्या केवळ सरकारी शाळांमध्येच घडत असते, असे निरीक्षण जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ यशपाल यांच्या नेतृत्वाखालील समितीनेही नोंदवून ठेवले आहे. मला यावेळी त्याची खूपच तीव्रतेने आठवण झाली.

"तुमचा घरचा अभ्यास कोण घेते?" माझा पुढचा प्रश्न."छे! छे! आम्हाला होमवर्क वैगरे काही नसतोच." सारी मुळे एका सुरात सांगू लागली. "अरे! पण काही तरी असेल ना?" मी उत्सुकतेने विचारले. "हो प्रोजेक्ट वैगरे असतो ना." त्यातली एक मुलगी म्हणाली. "मग कोण मदत करतेय त्यात?" मी उत्सुकतेने विचारले. "नाही, आम्हीच करतो."

"का आई-वडील नाही का करीत मदत?" "नाही. वडीलांना वेळच नसतो."सगळ्याचीच एका सुरात तक्रार! म्हणजे मुलगा आणि वडिलांचा संवाद फिसकटल्यासारखे चित्र येथेही. ऐकायला असे येतेय की, अनेक मुलगे वडिलांना विचारेनासे झालेत. त्याची इतरही कारणे अनेक असू शकतील. पण एकूणच मुलाला-मुलीला एकदा महागड्या इंग्लिश शाळेत घातले रे घातले की त्यांच्या आयुष्याची चिंताच मिटली! त्यांचे करीअर आपोआप होईल. या निर्धास्तपणामुळे अशा प्रकारच्या शाळांतील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता आयांवरच येवून पडलेली दिसतेय. (पालकांच्या सभांना होणारी आयांची गर्दी याचेच द्योतक आहे!) बर मग वडिलांचे जाऊद्यात. "अभ्यासात आईची मदत कितपत होतेय?" मी मुलांना प्रश्न विचारला. 'आईला त्यातले काही कळत नाही. कारण तिला इंग्लिश येतच नाही.' बहुतेकांचे माझ्या प्रश्नाला आलेले उत्तर! ऐकून मी म्हणजे माझ्यातला शिक्षक पुन्हा एकदा दचकलाच. नंतर काही पालकांशी बोललो त्यातून अजून काही गोष्टी समजत गेल्या. त्यातलीच एक म्हणजे हे चिरंजीव जोपर्यंत केजी-बीजीत होते तोवर आईचे इंग्लिश ठीक होते. आता हे सहाव्या वर्गात आणि आईला आता इंग्लिश येत नाही! मग आता तिने अभ्यासाचे काही विचारायचे नाही...बोलायचे नाही...सांगायचे तर अजिबात नाही! 'अभ्यास बघायचा आणि तपासायचा तर तुझा विषयच नाही.' असे मुले उलटून बोलू लागलीत. काही मुले तर जर का चुकून आईने विचारलेच तर 'होमवर्क झाला' असे बिनधास्त सांगून टाकतात.

मुले आली आणि तिथून निघून गेलीही. त्याला आता काही दिवस उलटून गेलेत. पण एक शिक्षक म्हणून माझ्या मनात भीती घर करून राहिलीय की या मुलांनी आतापासून आपल्या शैक्षणिक आयुष्यातून जन्मदात्या आईला वजा करून टाकलेय की काय? अजूनही ती जात नाहीये.

जाता-जाता मी सगळ्याच मुलांना विचारले "तुम्हाला घरचे लोकं शिक्षा करतात का?" म्हणजे फटके वैगरे देतात का? अपवाद वगळता बहुतेक मुले "होऽऽऽ" म्हणाली. "शिक्षा का करतात?" हे विचारले. त्या शाळेतील मुले म्हणाली 'टी.व्ही.जास्त वेळ पाहिला म्हणून...', 'खूप वेळ खेळत बसलो म्हणून...', 'कॉम्पुटरवर गेम खेळत बसलो म्हणून..', 'उलटून बोललो म्हणून...' एकूणच सूर होता की आई-वडिलांचे ऐकले नाही म्हणून. तर आमच्या शाळेतली मुले सांगत होती 'शेतात कामाला नाही गेले-गेलो म्हणून...', शेळ्या, गुरे राखायला नाही गेलो म्हणून..,' 'गोठ्यातल्या जनावरांना चारा-पाणी नाही केले म्हणून...' कार्ल मार्क्स मला आठवला. तो म्हणतो, वर्ग बदलला की प्रश्नांचे स्वरूपही बदलते!

मी दोन्हीकडच्या मुलांना आवडी-निवडी विचारल्या. त्यांच्या भावविश्वात घुसण्याचा प्रयत्न करून पहिला. त्यातही भयंकर तफावत! त्यातील सांस्कृतिक अंतर स्पष्टपणे जाणवणारे! सीमारेषा अत्यंत गडद! म्हणजे त्या शाळेतील मुलांच्या भावविश्वात हिंदी, इंग्रजी सिनेमे, त्यातील नट-नट्या, रियालिटी शोज, गाणी याला महत्वाचे स्थान. तर इकडचे आणखीन वेगळेच. खेळ, अन्न पदार्थ, कपडे, दळणवळण, दिनक्रम साऱ्या साऱ्या गोष्टीतील अंत लक्षात येत गेले...त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी. आनंद साजरा करण्याच्या पद्धती निराळ्या. वाढदिवसाचे तिकडे केवढे अप्रूप! तर इकडे तो केव्हा येतो आणि जातो हेदेखील गावी नाही! मुले आणि मुली स्वतंत्र बसून गाडया आल्या वाटेने धुरळा उडवीत निघून गेल्या... माझ्या मनात काही तरी सुरु आहे...

बराच वेळ विचार केला. लक्षात असे आले की, अरे आपले शिक्षण मुलांना चांगला माणूस बनविण्याविषयी बोलतेय कोठे? आपण जी मूल्यव्यवस्था स्वीकारली आहे, त्यातच काहीतरी खोट आहे. आपल्या शाळांत असे सर्वसमावेशक शिक्षण आहे कोठे? मार्केटची भाषा असलेल्या इंग्रजीच्या नावाखाली येथील शाळांतून मुलांना मार्केटची धोरणे पुढे नेणारे, आत्मकेंद्रित, ग्राहक बनविणारे शिक्षण तेवढे दिले जातेय. चिकित्सक विचार करायचे सांगतेय कोण? चांगला नागरिक घडवणे हे शिक्षणाचे उद्दिष्टच कुठेय?आजची व्यवस्था केवळ 'स्टक्चर' आणि 'फंक्शन' याबाबत बोलतेय. पण महत्त्वाचे म्हणजे यात 'पर्पज मिसिंग' आहे..!

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )