माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

पीरसाहेबांचा इतिहासप्रसिद्ध उरूस

एकात्मतेचे दर्शन घडविणारा आणि आठ आठ दिवस चालणारा राजूर [ता.अकोले] येथील पीरसाहेबांचा ऊरूस आता भरणेदेखील अशक्य झाले आहे. तो बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात ११० आदिवासी गावे, वाडय़ा-वस्त्या आहेत. त्यातील ४० गावे मोठी आहेत. यालाच ४० गाव डांगाण म्हणतात. या डांगाणाची प्रमुख बाजारपेठ आहे ती राजूर.उरुसाच्या निमित्ताने येथील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असे.परंतु आता त्याचा विपरीत परिणाम राजूरच्या बाजारपेठेवर झाला आहे.

येथे दरवर्षी अक्षय्यतृतीयेनंतरच्या शनिवारी पीरसाहेबांचा ऊरूस भरतो. तो पुढे मंगळवापर्यंत म्हणजे चार दिवस चालत असे. परिसरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याचे वेगळे महत्त्व आहे. गावातील दोन्ही समाजाचे लोक एकत्रितपणे संदल नाचवतात. पिढ्या न पिढ्यांपासून हे असे चालत आले आहे. याला मोठी परंपरा आहे. आसपासची गावे व वाडय़ा-वस्त्यांमधून येथे मोठी गर्दीही होई. उरूसाचे निमित्त साधून येथे जनावरांचा मोठा बाजारही भरत असे. अस्सल डांगी वळू हे या बाजाराचे विशेष आकर्षण असे. त्यात गायीसारख्या दुभत्या जनावरांचाही समावेश होता. त्याबरोबरच बैल, कोंबडय़ाचीही मोठी खरेदी-विक्री होत असे. तांदूळ,कडधान्ये, त्यामुळेच हा उरूस राज्यभर नावलौकिक मिळून होता. उरूस चार दिवसाचा असला, तरी त्याची तयारी व आठवडाभर चालायची. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आदिवासींच्या दृष्टीने विश्रांतीचा काळ असायचा. शेतातली काम-धाम आधीच उरकलेले असायचे. जगण्यात एक निवांतपणाही होता. आताच्यासारखी धावाधाव नव्हती. मुला-बाळांनादेखील काही घ्यायचे असेल तर उरुरुसाचा वायदा असायचा. तीदेखील उरुसाला न चुकता यायची. जत्रेचा मनमुराद आनंद घ्यायची. गावात पारापारावर निरनिराळ्या चर्चा रंगत.बुजुर्ग लोक जुन्या आठवणी सांगत असत.

अमुक एका गोऱ्ह्याला उरुसाला न्यायचे म्हटले की, त्याला खुराक दिला जायचा. वेळप्रसंगी पोटाला चिमटा, पण त्याला कशाचीच त्याला ददात नसायची. मोठी वर्दळ असे. पारंपरिक तमाशा, मनोरंजनाचे कार्यक्रम असा उत्साह सळसळत होता. आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे घडायचे. म्हणूनच खेड्या-पाड्यातील या यात्रा म्हणजे एक सांस्कृतिक वैभव होते.या गर्दीने राजूरची बाजारपेठ फुलून जात होती. मोठी आर्थिक उलाढाल होत असे. उरुसावरून परतत असतानाच पुढच्या वर्षाचे काही तरी नियोजन मनात घोळत असायचे.

अलीकडच्या काही वर्षांत मात्र यात्रा भरणेही मुश्कील झाले आहे. हा ऊरूसच आता रोडावला आहे. एकीकडे गावोगावच्या यात्रा पुन्ह्ना एकदा कात टाकीत असताना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरलेली ही यात्रा मात्र ओस पडू लागली आहे. गावोगावच्या यात्रा वाढविण्यासाठी काही लोक स्वतः खस्ता खातात. वैयक्तिक लक्ष घालतात. वेळ देतात. विविध उपक्रम राबवतात. लोकवर्गणीसाठी धडपड, देणगीदात्यांकडून पैसे उभे करून, मोठय़ा ढांगाढोंगात यात्रा पार पाडतात. हेवेदावे विसरून यात्रेपुरते का होईना एकत्र येतात. राजूरच्या पीरसाहेबांच्या यात्रेचे वैभव मात्र इतिहासात गुडूप होते की काय, अशी चिंता काही जण व्यक्त करीत आहेत.

उरूसाच्या आधी येथेच 'कठय़ांची' यात्रा भरते. त्याला अजूनही १५-२० हजार लोक हजेरी लावतात. येथील ग्रामपंचायतीने त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे यात्रेचे जुने वैभव पाहिलेल्यांना वाटते. यात्रेसाठी आवश्यक सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यंदा बैलबाजार भरला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केही व्यवहार त्यात झाले नाहीत. नाराज होऊनच बाहेरची मंडळी येथून परतली. हा ऊरूस व यात्रेवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था, तसेच गावची वैभवशाली परंपरा टिकवण्यासाठी धुरिणांनी वेळीच पावले उचलावी, निदान पुढच्या वर्षी तरी ही यात्रा गतकाळातील आठवणी चाळविण्यापुरतीच राहणार नाही, अशी आशा करूयात.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )