माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

सह्यागिरीला साज रानफुलांचा!

दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला परिसर अशी कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरु होणारा जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई - हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे.

फुलाची ही दुनियाच अदभूत अशी आहे. किती किती फुले? त्यांच्या त-हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना.. प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्ट्ये. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकपक्षी! पिवळीधमक सोनकी तर आठ - पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वर्षे मुक्यानेच काढते अन सप्तपदी भरली की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते. कारवीची फुले निळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसू लागते. कारवीच्या या रंग आविष्कारला सुरुवात झाली की स्थानिक आदिवासी ' नीळ आली,नीळ आली' असे म्हणू लागतात.

सर्वोच्च शिखर कळसुबाई, खड्या उंचीचा महाकाय हरिश्चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर, भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे आभाळाला भिडणारे सुळके, उरात धडकी खोल द-या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण.... आणखीनही बरेच काही..... निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली की भटकंतीचे चीज होते.

हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत सह्यगिरी आणि त्यातही कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा हा परिसर [कासच्या पठाराच्या बरोबरीने] जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ( हॉट स्पॉट) एक समजला जातो. पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे. फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या मधमाश्या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व - किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या मयसभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते.

फुलझाडाचे प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप,वेली आणि झाडे असे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उगवलेली वा-यावर डोलणारी गवतफुले पाहिली की, आपले मनही नकळत 'गवत फुला रे गुवत फुला...' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक, सौंदर्यवान नववधूसारखी ! काही एकदम चिमुकली नाजुकशी म्हणजे १.५ मिलीमीटरची तर काही अगदी टपोरी २५० मिलीमीटर आकाराची. वर्षभरात फुलणा-या फुलांत पांढ-या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक असतो. त्याखालोखाल गुलाबी, निळा, पिवळा, लाल, हिरवा या रंगांचा क्रमांक लागतो.

नवरात्रोत्सवाचे आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे.अगदी वर्षानुवर्षांचे. सह्याद्रीत सर्व ऋतुंमध्ये फुलणा-या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे. परंतु याचा बहर पीक पॉईंटला असतो तो सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली असली तरीसगळ्यात जास्त भाव खातेय ती पिवळी सोनकी!

सोनकीच्या इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... आणखी कितीतरी फुलांची! मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे. युगानुयुगांची.

येथील नवलाई स्थळविशेष गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी न्याहाळले आहे. विविधांगांनी. मात्र 'माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या सह्यापर्वताची ओळख नव्यानेच होते आहे. सभोवतीच्या गिरीशिखारांप्रमाणेच ही इवलाली रानफुले निसर्ग प्रेमींना साद घालताहेत. मग कधी येताय?

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )