माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

शाळा

    दुनियेच्या नजरेत भले तु असशील निरक्षर 
    पण ‘शिक्षण म्हंजी तिसरा डोळा...’ असं सांगत 
    मला अक्षरांशी मैत्री करायला तूच शिकवलंस 
    म्हणूनच म्हणतोय तूच माझी संस्काराची शाळा! 
     
      तु नेहमी म्हणायचीस- ‘गरिबीला लाजू नाई 
      अन् श्रीमंती आली तर माजू नाई...’ 
      तू शिवायचीस धुडक्याला धुडकं, 
      अन् जोडायची पदराला पदर... 
      सणा-वारालाच नवं लुगडं तूझ्या अंगावर 
      तू म्हणायचीस-
    ‘माणसानं फाटकं असलं तरी नेटकं असावं...’
    सदरा-चड्डी उसवली की टाचा-टीभा घालायची
    तुझ्या शिकवणीमुळं ठिगळाची चड्डी घालताना 
    लाज कधी वाटली नाही..! 
    घासातला घास द्यावा दुस-याला...
    हेही तूच शिकवलंस 
    ‘समदी मानसं इथून-तिथून सारखीच असत्यात, 
    अन् परतेकाचं रघात बी लालच असतंय...’ 
     
      मी दुसरीत 
      कुशीत निजायचो 
      एके दिवशी 
      तुझ्या कमरेच्या पिशवीतून
      मी दोन रुपये चोरले
      तु ओल्या शिमटीनं सटकावलंस
      इतकं इतकं...
      मी गुमान पैसे काढून दिले 
      मग घेतलंस मला मांडीवर
      अन् गल्लासात दूध पाजताना 
      सांगितलंस काहीतरी माझ्या कानात 
      शब्द नाहीत आठवत आता 
      पण आशय सोबत करतोय हर घडीला 
      म्हणूनच हरामाच्या रुपयाला कधी हात लावला नाय 
      बये, आज कंच्या शाळेत भेटतील हे संस्कार? 
     
    शेतीच्या शाळेतली
    तू हुशार विद्यार्थिनी 
    काळी माती, गाई-वासरं, 
    शेळ्या-बकरं यांच्याशी 
    तुझं अद्भूत अद्वैत... 
     
      कवा पेरावं? कुढं टोबावं? 
      इरवाडाचा पाटा घालावा कसा?
      तुझं नियोजनच बिनचूक... 
      निंदणी, खुरपणी, कापणी अन् पाऊस-पाणी
      तुझे आडाखे किती नेमके !
     
    लेकी-सुना 
    सुपडत-पाखडत 
    घरंगळलेल्या दाण्यांकडं बघून तू हळहळायची...
    म्हणायचीस- आया-बायांनो, 
    ‘असं उतल्या-मातल्यासारखं करू नाई ‘
    ‘दाणा म्हणतो दाण्यात घाल, 
    तुला मी माणसांत बसविल’
    केवढं तत्त्व तू सहजच बोलून जायची !
     
      तूला लिहिता-वाचता येत नव्हतं
      तू काही लिहिलं नाहीस पण... 
      जात्यावर बसल्यावर तुला जे सुचायचं...
      तव्हा तुझ्यातल्या प्रतिभेचं दर्शन घडायचं !
      सोबतीणींकडं तू मन मोकळं करायची... 
      सोसलेलं, भोगलेलं तरलतेनं सांगायची 
      तव्हा तुझी वेदना 
      सा-या दुनियेची असायची..! 
      गंगा शेतकरी साहित्याची 
      माझ्या अंगणातून वाहायची...
   
blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )