माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

जाणीवांचा शोध घेणारे संमेलन

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच विविधांगी विषयांवर उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करणारे शिक्षक आपल्याकडे आहेत. त्यापैकी काहीजणांना योग्य व्यासपीठ, ‘लिफ्ट’ मिळते. ते पुढे जातात. साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होते. परंतु अनेक शिक्षक असेही आहेत की, जे चांगले लिहिताहेत किंवा चांगले लिहिण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांना व्यासपीठ उपलब्ध नसल्याने कानाकोप-यातले असे शिक्षक काहीसे दुर्लक्षितच राहतात. अशा ‘लिहित्या’ शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी. त्यांच्याकडून अधिकाधिक जोमदारपणे साहित्य निर्मिती व्हावी. आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करता यावी, याशिवाय शिक्षकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, वाढावी. त्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे पहिले राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच आणि पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे संमेलन महात्मा फुले सभागृहात १४ व १५ एप्रिल रोजी हे संमेलन संपन्न झाले.

शिक्षणातले नवीन प्रवाह, त्यानुसार बदलत जाणारे संदर्भ, वेळोवेळी घेतली जाणारी धोरणं, शिक्षणातल्या समस्या या व अन्य शैक्षणिक विषयांवर सातत्याने लिहिणारे तसेच कथा, कविता, नाटक, कादंबरी अशाप्रकारचे ललित साहित्य विषय हाताळणारे आणि याबरोबरच अभ्यासक्रमाशी आणि इतर संबधित विषयांवर लेखन करणा-या महाराष्ट्रातल्या निवडक ४०० शिक्षकांना संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक विषयांवरील चिंतनाचा संदर्भ देत राज्याच्या शिक्षणाचा मागोवा घेतला. शिक्षण क्षेत्रापुढील नवीन आव्हाने लक्षात आणून देताना शिक्षकांना सजग केले. जगण्यापासून साहित्य वेगळे करता येत नाही, त्यामुळे जगण्याला भिडणारे साहित्य शिक्षक साहित्यिकांनी निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले.

‘माझी साहित्यिक जडण-घडण’ या विषयावर प्रिया निघोजकर आणि जितेंद्र देवकर यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षक साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात ‘निशाणी डावा अंगठा’ आणि ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या प्रसिद्ध कादंब-यांचे लेखक रमेश इंगळे उत्रादकर, ‘गावठाण’ आणि ‘रौंदाळा’ या निराळ्या वाटेने जाणा-या कादंब-याचे कर्ते करविते कृष्णात खोत आणि उमरग्याचे तरूण कवी बालाजी इंगळे या त्रिकुटाच्या मुलाखत घेतल्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या संवादातून तिघांचा साहित्यविषयक प्रवास उलगडत गेला. साहित्यविषयक प्रेरणा सांगताना आजच्या शिक्षण व्यवस्थेतील व्यंगांवर रमेश इंगळे व खोत यांनी नेमकेपणाने बोट ठेवत मार्मिक भाष्य केले. त्याला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

लेखिका रेणू दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘माझे शैक्षणिक विषयांवरील लेखन’ या परिसंवादात कोल्हापूर येथील सृजन आनंद विद्यालय या प्रयोगशील शाळेतील शिक्षिका सुचिता पडळकर, आदिवासी भागात कार्यरत असलेले भाऊसाहेब चासकर (अकोले, नगर), वेच्या गावीत (कर्जत, रायगड) यांनी सहभाग घेतला. रेणुताईंनी आपल्या लेखनामागचं प्रयोजन स्पष्ट केलं. सुचिताताईंनी ‘शिक्षणाच्या उगमापाशी’ या पुस्तक लेखनाची पार्श्वभूमी सांगितली. परिस्थितीमुळे आलेल्या अडचणींचे भांडवल न करता कार्यरत असलेल्या गावीत यांनी आदिवासी मुलांना शिकविताना राबविलेल्या बोलीभाषा प्रकल्पाविषयी सांगितले. चासकर यांनी इंग्रजी शाळांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना सरकारी शाळांवर होणा-या अनाठायी टीकेविषयी खंत व्यक्त करत याबाबत केलेल्या लेखनाविषयी माहिती दिली.

सायंकाळच्या सत्रातला ‘शब्द झुल्यावर’ हा कवितांचा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला. वीरधवल खडे, केशव खटींग, बबलू वडार, शब्बीर शेख, तृप्ती अंधारे, ज्योत्स्ना चंदगुडे, किशोर बळी, लक्ष्मण जेवणे, संगीता जोशी, गोविंद पाटील, गंगाधर रासगे, रावसाहेब मुरगी, मधुकर जांभळे आदी एकाहून एक सरस कवींनी यात सहभाग घेतला. शेती, शेतकरी, कष्टकरी यांना भेडसावणा-या समस्यांवर मर्मभेदी भाष्य करत बहुतेक कवींनी व्यवस्थेवरच शब्द प्रहार केले. शिक्षण, स्री भृणहत्या या विषयांना थेट हात घातला. काही कवींनी माहिती तंत्रज्ञानातील परवलीच्या शब्दांचा अत्यंत प्रभावी वापर करीत सादर केलेल्या रचना तसेच लावणी व अन्य संवेदनशील विषय अत्यंत तरलतेने हाताळणारे कवी भाव खावून गेले. रात्री ‘कलाविष्कार’ हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.

दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात ‘वाचन, लेखन व अभिव्यक्तीची आवड निर्माण करणारे उपक्रम’ या विषयावर बोलताना बुलढाण्याच्या भारत विद्यालयातील नावाजलेले ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी शाळा व समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी सांगितले. भोर तालुक्यातल्या अत्यंत दुर्गम गावात काम करणा-या प्रमोद धायगुडे या तरुण गुणी शिक्षकाने स्वत:चे काम आपल्या सहजशैलीत सांगताना उपस्थितांची वाहवा मिळविली. मुलांना, गावक-यांना ‘लिहिते’ करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न... ‘रानपालवी’ हस्तलिखित सुरु करण्यापासून शेतात, रानात हिंडून, घरोघरी फिरून केलेले लोकगीते, ओव्या आदीचे संकलन... हा प्रवास सर्वांना थक्क करून गेला. फलटण तलुक्यातील रवींद्र जंगम यांनी केल्या प्रयत्नामुळेच तेथील सातव्या वर्गातल्या मुलींनी कवितासंग्रह प्रसिध्द केला आहे. चंद्रपूरच्या आदिवासी भागातील वैशाली गेडाम या वेगळ्या वाटेने जाणा-या शिक्षिकेने भाषा शिक्षणाबाबत निराळा सूर लावला. चर्चासत्रात सरतेशेवटी बोलताना सह्संचालक दिनकर पाटील यांनी सातारा, कोल्हापूरमध्ये ‘शाहू ग्रंथ महोत्सव’च्या माध्यमातून सुरु केलेल्या कामाची माहिती दिली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सगळ्यांनीच दाद दिली.

‘मानवी जीवनमूल्ये रुजवण्यासाठी पाठ्यपुस्तके’ या विषयावर वि. ना. लांडगे (सातारा), फारुख काझी(सोलापूर) आणि स्नेहा जोशी सहभागी झाले. काझी यांनी विषयाच्या अंगाने पाठ्यपुस्तकांची चिकित्सा केली. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिबिंब पाठ्यपुस्तकांत पडते, असे सांगत सर्वधर्मसमभाव व अन्य मुल्ये रुजवण्यासाठी आपली पाठ्यपुस्तके कमी पडत असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. लांडगे व जोशी यांनी मात्र पाठ्यपुस्तके मूल्ये रुजवण्यासाठी पुरेशी असल्याचे स्पष्ट करीत आपली बाजू मांडली.

८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला. शिक्षक साहित्यिकांनीच मराठी साहित्याचे दालन अधिकाधिक समृद्ध केल्याचे सांगत डहाके यांनी विशिष्ट टप्प्यापर्यंत तरी बोलीभाषा शिक्षणाचे माध्यम बनल्या पाहिजेत, असा आग्रह धरला. बोली भाषा महत्त्वाच्या आहेत. कारण आधी बोली मेल्या की मग भाषा मरते. मग संस्कृती धोक्यात येते, असे परखड विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. शिक्षक साहित्यिकांनी अवतीभोवतीच्या घटना-घडामोडींकडे साहित्याचा विषय म्हणून पहावे, सडेतोड लिहीत जावे, असा सल्ला त्यांनी दिला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. धुळे-नंदूरबारपासून सावंतवाडीपर्यंत आणि चंद्रपूरपासून ठाण्यापर्यंतचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. संमेलनातील निमंत्रित शिक्षक साहित्यिक होते तसेच सहभागी शिक्षकदेखील लिहिणारे किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणारे होते. राज्यभरातील सुमारे ३००-३५० शिक्षक सहभागी होतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ती संख्या पाचशेच्या घरात गेली. प्रतिसाद पाहून यापुढे दरवर्षी संमेलन आयोजित करण्याचा मानस संयोजकांनी बोलून दाखवला. लिहिण्याचा प्रयत्न करणा-या शिक्षक साहित्यिकांना योग्य ती दिशा मिळावी, यासाठी विभागवार लेखन कार्यशाळा घेणार असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले.

शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या. त्यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. राज्याच्या माजी शिक्षण सचिव व मंचच्या मुख्य संयोजक डॉ. कुमुद बन्सल, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक नामदेवराव जरग, सहसंचालक दिनकर पाटील व शकुंतला काळे, कैलास थिटे, तसेच मंचचे डॉ. वसंत काळपांडे, अॅड. मनीषा पाटील, दत्ता बाळसराफ यांनी संमेलनाच्या नियोजनापासून यशस्वितेपर्यंत बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देत बरीच मेहनत घेतली. परिषदेच्या ‘जागर जाणीवांचा’ आणि ‘माझा वेगळा उपक्रम’ तसेच शिक्षण विकास मंचाचे डॉ. वसंत काळपांडे व बसंती रॉय यांनी संपादित केलेल्या ‘शाळांचे प्रगतिपुस्तक” या आणि ‘ग्रंथाली’चे ‘उंबरठ्यावरचे दिवस’ या भाऊ गावंडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन संमेलनात झाले. लेखक भाऊ गावंडे यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा आणि आपला जीवन प्रवास कथन केला. दोन दिवस ते संमेलनात पूर्ण वेळ आवर्जून उपस्थित होते. ग्रंथ दिंडी, पुस्तकांची विक्री व प्रदर्शन या बरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची उपस्थिती यामुळे हे संमेलन वातावरण निर्मिती करण्यात ब-यापैकी यशस्वी झाले असे म्हणता येईल. मुलाखती, परिसंवाद, चर्चासत्र यातून शिक्षकांना काय आणि किती मिळाले, हे लगेचच मोजता किंवा सांगता येणार नाही. पण या उपक्रमाचे सर्वच शिक्षकांनी स्वागत केले, हे मात्र नक्की. अर्थातच ही केवळ सुरुवात आहे. सुधारणेला आणि विस्ताराला अजून भरपूर वाव आहे.

सध्याचे शिक्षण आणि शिक्षक या ना त्या कारणाने माध्यमांमध्ये सतत चर्चेत असतात. विद्या परिषद आणि शिक्षण विकास मंचने आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातले साहित्यिक किंवा उपक्रमशील शिक्षक येथे दोन दिवस जमले होते... आपल्या कामाविषयी भरभरून बोलत होते...सांगत होते... ऐकणारेही मन लावून ऐकत होते... साहित्यिक शिक्षकांच्या जाणीवांचा जागर सुरु होता. पण माध्यमांनी शिक्षकांच्या साहित्य जागराकडे काहीसे दुर्लक्षच केल्याची खंत काही शिक्षक बोलून दाखवीत होते. शिक्षकांच्या कथित कामचुकारपणाच्या, संघटनांचे राजकारण, पतसंस्था-बँका त्यांतील अंतर्गत लाथाळ्या याच्या रसभरीत बातम्या देणारी माध्यमे शिक्षकांचे हे क्रियेटीव्ह काम सुरु असताना कुठे होती काय माहीत? असे का झाले? सांगता येणे कठीण आहे. पण झाले हे वास्तव आहे.

संमेलनाला अध्यक्ष हवा, इथपासून व्यापक प्रमाणात संमेलन आयोजित करावे, असाही सूर जाणत्या साहित्यिकांनी लावला. सूचना अनेक आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे सुधारणेलाही भरपूर वाव आहे. पण कुठेतरी सुरुवात झाली हे सगळ्यात महत्त्वाचे. ‘अरे, आपल्याकडं कामगारांचीही संमेलनं होतात. पण आतापर्यंत शिक्षकांचं एकही संमेलन झालं नव्हतं.’ एका शिक्षकाने उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून या संमेलनाचे महत्त्वच अधोरेखित होतेय... आणखीन वेगळे सांगायची गरज ती काय? आता हा उत्साह टिकवायची जबाबदारी संयोजकांबरोबर शिक्षकांचीदेखील आहे.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )