माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

भेकरेवाडीचा शैक्षणिक अंधार भेदणारा 'दिवा'!

शिक्षक म्हणजे कामचुकार, अप्रामाणिक, गुणवत्तेचे मारेकरी...त्यांना फक्त पगार तेवढा हवा आहे. काम नकोच आहे. शिक्षकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अजिबातच उरलेली नाहीये. अशी हेतुपूर्वक टीका, आरोप समाजातील एका मोठ्या गटाकडून सुरु आहेत. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही कदाचित. पण जणू काही हेच प्रातिनिधिक चित्र आहे असे भासवायचा कार्यक्रम जोरात आहे. दुर्दैवाने काही माध्यमे ही चर्चा चवीने चघळत आहेत. तो काही या लेखाचा विषय नाही. पण अशी ओरड होत असतानाही आज वाडी-वस्तीवर झटून काम करणारे अनेक शिक्षक तेथील 'अंधार' दूर करण्यासाठी जे करीत आहेत, त्याला खरे म्हणजे तोड नाही. त्यातलाच एक कर्जत (जिल्हा-रायगड) तालुक्यातील भेकरेवाडीचा वेच्या रुध्या गावीत!

वेच्या गावीत मुळचा नंदुरबार जिल्ह्यातला. सातपुड्यातील एका कुठल्यातरी पुडात वेच्याचे रायपूर हे लहानसे आदिवासी खेडे वसलेले. तेथील आदिवासींचे रोजचे जगणे म्हणजे संघर्षाची नवी कहाणी. रोजीरोटीची जेथे भ्रांत आहे तेथे पोरांच्या शिक्षणाची 'चैन' कोणाला परवडणार? पण वेच्याच्या बापाने मनाशी ठरवले होते. काहीही होऊदेत. कितीही कष्ट पडूदेत. पण वेच्याला शिकवायचे म्हणजे शिकवायचे. पहिली ते चौथी वेच्या रायपुरात शिकला. गुरुजी चांगले भेटले. चंद्रमौळी झोपडीत दिव्याच्या उजेडात अभ्यास करीत चौथीला वर्गात दुसरा क्रमांक मिळावीत 'एक गुणी मुलगा' असा लौकिक लहान वयातच वेच्याने संपादन केला.

नवापूरच्या बोर्डिंगमध्ये प्रवेश घ्यायला बापाकडे शंभर रुपये नव्हते. शिक्षण थांबणार असे वाटू लागले पण उसनेपासने करून पैसे मिळाले. मेहनत घेऊन अभ्यास केला. बापाचा विश्वास सार्थ ठरवीत वेच्याने दहावीत ६९.८५ टक्के गुण मिळवले. ज्या वस्तीत कोणी दहावीपर्यंत नीट शिकलेला नव्हता, तिथे वेच्याने हे करून दाखवले! गावातील लोकांनी तर तेव्हा वेच्याची बैलगाडीतून मिरवणूक काढली. घरची गरीबी असल्याने मित्रांच्या सल्ल्यानुसार डी.एड.चा 'शॉर्टकट' स्वीकारला खरा पण तेथील २००० रुपये फी भरायला पैसे कुठे होते घरात. वेच्याचा बाप हरला नाही. एका दारूवाल्याकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले. डी.एड.झाल्यावर लगेचच नोकरी मिळाली. पण तीही सत्त्वपरीक्षा पाहणारी.

रायगड जिल्हा परिषदेतून कर्जत तालुका दिला. कर्जतला हजर झाल्यावर तिथल्या कारकुनाने वेच्याचा हातावर ऑर्डर ठेवत 'लगेच जाऊन शाळेत हजर हो' असे बजावले. आणि हो, 'सात शिक्षक आहेत, मोठी शाळा आहे' असे सांगायला तो विसरला नाही! नोकरीच्या, शाळेच्या ओढीने मनातल्या मनात आपल्या स्वप्नातल्या शाळेचे चित्र रंगवत वेच्या मूळगावी पोहचला. तेथे मुख्याध्यापकांनी त्याला हजर करून घेतले खरे; पण तेथे एक विलक्षण प्रसंग घडला. उपचार पूर्ण होताच मुख्याध्यापकानी एका शिक्षकास 'गावीत गुरुजींना त्यांची शाळा दाखवा' असे सांगितले. तो शिक्षक तडक बाहेर आला. समोरच्या भल्यामोठ्या डोंगरच्या दिशेने बोट दाखवत म्हणाला "त्या डोंगराच्या माथ्यावर तुमची शाळा आहे. ती पायवाट दिसती का? तिनं चालत जायचं. दीड-दोन तास चढून गेलं की शाळा येते. ही शाळा चालवायची जबाबदारी आमची होती. बरं झालं तुम्ही आले. ही घ्या तुमच्या शाळेची चावी. आता आमची कटकट मिटली एकदाची..." ते ऐकून वेच्या पार गळून गेला. निराश झाला. पायाखालची जमीन खचल्यासारखे त्याला क्षणभर वाटले. वेच्याच्याच भाषेत सांगायचे तर- "आपण आलो कुठून? आई-बाप कुठं? नोकरी मिळाली ती कुठं? कशाचा कशाला मेळ लागत नव्हता. आयुष्याने आजवर इतक्या परीक्षा घेतल्या होत्या. त्या पास होत होत इथवर कसाबसा आलो. त्यात आणखीन या नव्या परीक्षेला सामोरे जायचे होते! नोकरी मिळाल्याचा आनंद ढग विरून जातात, तसा विरून गेला होता. कुठल्या कुठे...अक्षरशः रडायलाच येत होतं. पण काही इलाज नव्हता. स्वतःला कसंबसं सावरलं. नोकरीची आत्यंतिक गरज होती. 'सांगता येईना आणि सहनही होईना' अशी काहीशी विचित्र स्थिती होती!"

मूळगावच्या एका शिक्षकाने वेच्याच्या मनात काय सुरु आहे, ते नेमके ओळखले. त्याने समजूत घातली. म्हणाला तुझे तरी काय नाही. तुझ्या शाळेच्या पुढे चालत गेल्यावर ढाक नावाचे गाव आहे. रोज तीन-साडेतीन तास चालत जावे लागते. माझे दुःख थोडेसे हलके झाले. शाळेपर्यंत जावून पाहू असे मनात आले. शेडगे नावाच्या शिक्षकाला बरोबर घेतले. बराच वेळ ती रानवाट तुडवल्यावर डोंगर माथ्यावर वस्ती दिसली. २०-२५ झोपडीवजा घरांची वस्ती. आजूबाजूला उघडीबंब पोरं गुरे वळताना दिसली. काही जणांच्या अंगावर मळकटलेले कपडे. सोबतचे शिक्षक वेच्याला म्हणाले- "गुरुजी तुम्हीच तुमच्या शाळेचा शोध लावा!" वेच्या विचारात पडला पुन्हा एकदा. वस्तीतल्या एका झोपडीवजा घराचे दर ढकलले. तशी आतून दोन-चार कुत्री बाहेर आली. आत डोकावल्यावर पाहिले तर एक कोंबडी तिच्या पिलांना दाणे कसे टिपावेत, याचे प्रात्यक्षिक दाखवीत होती. उबट-कुबट वासाने भवताल व्यापलेला...गोठा बरा अशी ती जागा! शेजारी उभे असलेले शेडगे गुरुजी वेच्याला म्हणाले- "गावीत गुरुजी ही तुमची शाळा!" इमारतच नाही तिथं खडू-फळा फारच दूरच्या गोष्टी. त्या जागेला शाळा तरी का म्हणावे? असा प्रश्न वेच्याला छळत होता. एकसारखा. काही तासांपूर्वी नोकरीची ऑर्डर हातात पडली, तेव्हा याने एका सुंदर शाळेचे स्वप्न पाहिले होते. आणि नशिबी काय तर हे असे... काही तासांपूर्वी नोकरीची ऑर्डर हातात पडली, तेव्हा याने एक सुंदर शाळेचे स्वप्न पहिले होते. आणि नशिबी काय तर हे असे... वेच्या हताश झाला. निराशेने मनाचा ताबा घेतला पुन्हा एकदा. पण सकारात्मक विचार करायची सवय त्याला उपयोगी पडली. त्याचा सारा सारा जीवनसंघर्ष एखाद्या चलचित्रपटासारखा नजरेसमोरून गेला. अगदी क्षणार्धात. मग मनातल्या मनात विचार केला, याही परिस्थितीतून निभावून नेऊ. स्वत:लाच बजावलं. हरायचं नाही. मागे तर अजिबात फिरायचं नाही.

सोबतच्या गुरुजींनी भेकरेवाडीतल्या दोघा-चौघांच्या वेच्याशी (म्हणजे गावीत गुरुजींशी) ओळखी करून दिल्या. दुस-या दिवशी वाडी दाखवायला एका माणसाला सोबत घेतले. गुरुजी पोचले पण पोरं कुठे? कोणी शाळेकड फिरकेना! इतर ठिकाणी मुलं गुरुजींची वाट पाहतात, इथे उलटेच झाले. थोड्या वेळानं एकजण लाजतबुजत आला. वेच्यान नाव विचारलं. मग या मंगळ्यानं वाळक्या, येशा, खंड्या, जान्या, झुगी, चिम्या, जीवन्या अशी ७-८ पोरं गोळा करून आणली. शाळेत यायचं कसं? बसायचं कसं? पोरांना काही गंधवार्ताचा नव्हती. इकडून तिकडून पोरं यायला लागली तर संवादच होईना! मुलांची भाषा ठाकूर... वेच्याची भाषा नंदुरबारची मावची... पुस्तकाची भाषा मराठी म्हणजे प्रमाण मराठी! काही केल्या कशाचा कशाला मेळ बसेना. केंद्रप्रमुख शाळेत आले तेव्हा त्यांनी शाळेचं दर्जा 'अत्यंत असमाधानकारक' असा शेरा लिहिला! पण मग वेच्याने याकडे नकारात्मक नजरेने न पाहता मेहनत घ्यायला सुरुवात केली.

पहिल्यांदा काय तर मुलांची भाषा शिकून घेतली. वारंवार येणा-या शब्दांचा संग्रह केला. तीन वर्षे गेले. पण त्याचा एक लहानसा शब्दकोशच तयार झाला. आता शिक्षक-पालक-विद्यार्थी यात उत्तम संवाद होऊ लागला. या तिन्ही घटकांत जवळीक निर्माण झाली. वेच्याने पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवले. मुले रोज शाळेत येऊ लागली. शिकू लागली. लिहू-वाचू लागली. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल करीत न बसता वेच्या प्रचंड कष्टाने हे सारे उभे करीत होता. पुढे शाळेला इमारत झाली. भिंती बोलक्या झाल्या. मुलांनाही शाळेचे आकर्षण वाटू लागलं. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. बघता बघता शाळेचं रूप पालटलं.

मुलांच्या जीवनाशी शिक्षण जोडताना वेच्याने वेगवेगळे प्रयोग केले. दोरीवाचन, बोलीभाषा ते प्रमाणभाषा, परिसर भेटी असे उपक्रम सुरु झाले. नवोपक्रम स्पर्धेत तर भेकरेवाडीची शाळा राज्यात सलग तीन वर्षे पहिली-दुसरी आली! पुढे २००३-०४ साली तर रायगड जिल्हा परिषदेने या कामाची दाखल घेत वाडीच्या या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देवून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आता राज्यस्तरावरील सरकारी संस्था या वाडीच्या शाळेची दखल घेऊ लागल्या होत्या. 'जीवन शिक्षण' या सरकारी मासिकाने या शाळेवर मुखपृष्ठ कथा लिहिली. मातला होता- 'नो रिझन बट रिझल्ट !' राज्यभरातून अभिनंदनाची १२२ पत्र आली. वेच्या खुश. मेहनतीच्या वेलीला यशाचे सुंदर फुल लागले होते. मनोबल उंचावले. कर्जत पंचायत समितीने वेच्याला आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्याच्या कामाचा गौरव केला.

वेच्याचा मूळ स्वभाव धडपड्या वृत्तीचा. समविचारी शिक्षकांना एकत्र करून त्याने 'सावित्रीबाई फुले शिक्षण सहविचार मंच' सुरु केला. त्यातून धडपडणाऱ्या शिक्षकांचा परस्पर संवाद सुरु झाला. पुढे शिक्षक पुस्तकभिशी सुरु झाली. सध्या या भिशीचे ४८ सभासद आहेत. महिन्याला १०० रुपये जमा होतात. त्याची पुस्तके घेतली जातात. आजवर ४४ भिश्या झाल्यात. ७२,९२२ रुपयांची ३२२ पुस्तके शिक्षकांनी खरेदी केली, वाचलीत. या अभिनव उपक्रमाचे खूप कौतुक झाले. मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. वाचन संस्कृती लोप पावतेय, असा कंठशोष करणाऱ्यांनाही हे समजून घ्यावे, असे उदाहरण.

वेच्याला एकदा सहजच विचारले तुझे नाव वेच्या असे का ठेवले रे? म्हणाला- आई म्हणते 'वेच्या म्हणजे चांगले तेवढे वेचणारा...! शेवटी असे आहे की, इच्छा तेथे मार्ग. वेच्याची इच्छाच त्याला यशाच्या मार्गाने घेऊन गेली. त्याने तुडवलेल्या पायवाटेचा आता रस्ता झाला आहे. आज त्याची बदली शेजारच्या इंजीवली शाळेत झालीय. पण एक मत्र नक्की आहे की, भेकरेवाडीवरचा शैक्षणिक अंधार भेदणारा दिवा आहे तो वेच्या गावीत!

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )