माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

वसंत बहार !

ऋतुराज वसंत म्हणजे चैतन्याची एक आनंददायी लहरच जणू ! त्याच्या येण्याची अवघी चराचर सृष्टी केवढया उत्कटतेने वाट पाहते. अनेक फुलझाडांना फुलण्याचे जणू डोहाळे लागलेले असतात. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे महिने तर ऋतुराजाच्या प्रेमात पडलेले ! सध्या मनोहर फुलांचा वसंतोत्सव बहरला आहे. नानाविध रूप, रंग, रस, गंध आणि आकाराची फुलं सहजच आपलं लक्ष वेधून घेताहेत. या अनोख्या पुष्पोत्सवाला पार्श्वभूमी लाभलेली असते ती रखरखीत, भगभगीत वातावरणाची. निष्पर्ण झाडांच्या अंगाखांद्यावर फुललेल्या या फुलांमुळं तापलेली उन्हंदेखील काहीसे सौम्य, शीतल वाटू लागतात... वाळवंटातल्या ओअॅसिसाप्रमाणं!

'ऋ' किंवा ऋतू म्हणजे फिरता काल. तर हे कालचक्र अव्याहतपणे पुढे-पुढे जात राहते. बघता-बघता डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलत राहतात. सृष्टीची रुपेही बदलतात. निसर्गाच्या लावण्यविभ्रमाचे अनोखे जग पुढ्यात येउन उभे राहते. विधात्याच्या कुंचल्यातून साकारलेल्या मोहमयी चित्रलिपीचे रहस्य आपोआप उलगडत जाते. हासरा, नाचरा, सुंदर साजिरा अशा विशेषणांनी ज्याचे वर्णन केले जाते, त्या चैतन्यदायी श्रावणाप्रमाणेच वसंताचीही एक साखळी असते. फाल्गुन, चैत्र अणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूच्या अनेकानेक रंगानी नटलेले. प्रखर उन्हाने तापलेले. यातला चैत्र म्हणजे वसंताचा खराखुरा सखा. वसंताच्या नावातच एक जादू आहे. त्याच्या स्वागतासाठी अगणित पुष्पमंडळं फुलून येतात. रंगांचे, गंधांचे मधुर गाणे गात भोवतीने नाचू लागतात.

नाजूक-कोमल पुष्पांनी डवरलेल्या, बहरलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन सध्या जिकडेतिकडे घडतेय. त-हेत-हेच्या झाडांवर पानाफुलांची ही सुकुमार शोभा किती उत्कटतेने अवतरलीय. चैत्र अजून यायचाय ! चैत्राची पालवी असतेच मोठी मनमोहक. पिंपळाची गर्द गुलाबी पाने तर नुसती पाहण्यातही केवढी मौज असते. चैतन्याची विलक्षण साक्ष पालवी देतेय. या छानदार पालवीसोबतच अनेकानेक फुले सृष्टीच्या सौंदर्यात आपल्या परीने भर घालताहेत.

पांगारा, पळस, काटेसायर यांचा तो लालभडक रंग. आणि दाट डौलदार पुष्पभाराचा मळवट भरलेल्या चाफ्याचं वैभव तर केवळ अवर्णनीय असेच. पाहावे आणि पाहताच राहावे. लाल, पिवळी, गर्द निळी, गुलाबी, पांढरी फुलं जणू रंगपंचमी खेळताहेत. लालभडक फुलं तर अंगार फुलल्याचा आभास निर्माण करतात. काळोख्या रात्री एखादी मशाल दूरवरून आपले लक्ष वेधून घेते ना. अगदी तशी. ग्रीष्मात झालेली पानगळ. तापलेली उन्हं. ओसाड, भकास रान. वसंतातल्या पुष्पनृत्याच्या रंगमंचाला पार्श्वभूमी असते, ती अशी भगभगीतपणाची. रुक्षपणाची. आणि त्यामुळेच की काय, हा रंगविलास आणखीनच खुलतो.

यात सर्वाधिक कोण नटलेय माहितीये ? तर ती आहे घाणेरी ! बघा ना. एरवी या घाणेरीकडे कोणाचे विशेष लक्षही जात नाही. पण सध्या ती अशी काही शृंगार करून बसलीय की बस्स! बारीकशा शोभिवंत फुलांच्या साजामुळं तिचं सौंदर्य आणखी खुललंय. वसंत म्हणजे घाणेरीचा प्राणसखाच जणू ! आपल्या प्रियकराच्या आगमनाने ती अंगाअंगाने मोहरलीय. मधूनच येणारा खट्याळ, खोडकर रानवारा तारुण्याच्या लाटेवर स्वार झालेल्या घाणेरीची खोडी काढतोय! तिला चिडवतो आहे. कडूनिंबाच्या लहान-लहान फांद्यांनी जणू पांढ-या तु-यांच्या मंडवळ्या बांधल्याहेत. वाऱ्यासोबत त्या मस्त झोके घेताहेत.

सुगंधी फुलांचा शिरीष दुरूनच अस्तित्वाची साक्ष देतोय. त्याचा घमघमाट सुवासिक झुळूकच अंगावरून गेल्याचे समाधान देत आहे. त्याच्या फुलांभोवती मधमाशा, भुंगे रुंजी घालताहेत. केवढी लगबग सुरु असते त्यांची. चाफ्याच्या निष्पर्ण फांद्यातून दांडोरे बाहेर पडलेत. कित्ती दिवस रुसून बसलेल्या कळ्या उमलताहेत. फुलताहेत. हळूहळू उभे झाडच फुलून गेलेय. त्याचा तो मंद गंध दरवळतोय. चराचराला पुलकित करतोय.

आंब्याच्या झाडांचे ते मोहरलेले रुपडं मनाला मोहिनी घालतेय. काही झाडांच्या लांबलचक देठांना बारक्या कैऱ्यांचे घोस लगडलेत. आंबा कधी पाडी लागतोय, याची वाट वेडे राघू पहाताहेत. काही दिवसांनी आंब्याच्या फळांवर चोच मारून ती पाडाला लागलीत का, याची खात्री राघू करू लागतील. ते दृश्य केवळ पाह्ण्यातही मौज असते.

करवंदीच्या जाळ्यांतून गोलाकार करवंदे डोकावताहेत. अंजन वृक्षाची निळाई ,नवलाई मोहित करतेय. हळदीचा रंग ल्यायलेली बहाव्याच्या पिवळ्याधमक फुलाची श्रीमंती आणि ते ऐश्वर्य मनामनाला मोहिनी घालतेय. मोगरा, जाई-जुई आणि रातराणी चांदण्या रात्रींना सुगंधित करताहेत. चित्तवृत्ती प्रसन्न करणारं वसंतातलं हे पुष्प-सम्मेलन पाहून आपण आचंबित होतो. निसर्गाने प्रत्येक झाडाला अलौकिकत्व बहाल केल्याची साक्ष आपल्याला मनोमन पटते. ‘ऋतू आला वसंत सांगायला...’ असं गुणगुणत ही पालवी, ही फुलं आमंत्रण देताहेत. कोकीळा 'पंचम' आळवते आहे. पक्षी जणू मिलनाची गाणी गाताहेत. हा विराट असा निसर्गाविष्कार आपल्या पुढ्यात उभा आहे.

फाल्गुन, चैत्र निसर्गाची शोभा वाढवत नेतात. वैशाख या रंगविलासाला पूर्णत्व देतो. चैत्रभर मुके असलेले गुलमोहराचे झाड आनंदभराने फुलून जाते. तांबड्याजर्द फुलांचे लोभसवाणे गुच्छ डोईवर घेऊन नाचत राहते. वर्षाराणीच्या स्वागतासाठी!

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )