माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

'वीरगाव' नंतर तरी आपण काही शिकणार आहोत की नाही..?

'ज्या समाजात स्त्रियांचा आदर केला जात नाही, तो समाज कधीच पुढे जात नाही,' असे सुविचारवजा वाक्य कुठे तरी वाचण्यात आले होते. ते आता आठवण्याचे कारण आहे ती नगर जिल्ह्यातील वीरगावची (ता.अकोले) घटना. पुन्हा कोठेवाडी होणार नाही, अशा भ्रमात आपण सारे असतानाच अवघ्या दहा वर्षांतच वीरगावच्या घटनेने सणसणीत चपराख दिली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेचेही चांगलेच धिंडवडे काढले आहेत. आमच्या अकोल्याचे लोक तर आता म्हणताहेत की, जे दूरवर घडलेले ऐकायला यायचं, वाचायला मिळायचं ते आता थेट उंब-यापर्यंत आलंय, चुलीपर्यंत येऊन पोचलंय...

वीरगाव हे गाव अकोले शहरापासून उत्तरेकडे १२ की.मी. अंतरावर आहे. या गावाच्या शिवारात एका समृद्ध माळावर टेमगिरे कुटुंबाची ही उजाड वस्ती आहे. मात्तीत बांधलेलं एक कौलारू झोपडीवजा घर. दारिद्र्याच्या सा-या खाणाखुणा तेथे अगदी सहजच दिसून येतात. विड्या बांधून येथील वृद्ध दाम्पत्याचा उदरनिर्वाह सुरु होता. विडी उद्योग बंद पडल्यावर मग पोटाची खळगी भरण्यासाठी म्हातारपणीही मजुरीने जात.अशातच जेमतेम आठवडाभरापूर्वी भिकाजी टेमगिरे यांचे निधन झालेले. त्यांच्या पश्चात एकूण सात मुली आणि बायको. मुलगा नाही. दु:ख वाटून घ्यायला मुली व अन्य नातेवाईक तेथे जमलेले. अंत्यविधी झाला आणि नंतर काही लोक आपापल्या घराकडे परतले. पाणी पाजले ती आणि आणखीन एक लेक आईजवळच तिला धीर द्यायला थांबली. विहिणीभाईनीही सोबतीला होत्या. सर्वजणी घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने दु:खही आणि वियोगाने व्याकूळ झालेल्या. दोन तरुण मुली आणि चार म्हाता-या आयाबाया घरात निजलेल्या. त्यात शनिवारचा (तारीख ३ जुलै ) दिवस उगवला तोच मुळी त्यांच्यासाठी काळा दिवस म्हणून. ती काळ रात्र त्यांच्यावर मोठाच घाला घालून गेली. पाच-सहा दरोडेखोरांनी या दीनवाण्या झोपडीत अक्षरशः हैदोस घातला. सर्व महिलांना विवस्र केले. या नराधमांनी दोन्ही विवाहित तरुणींवर आळीपाळीने अत्याचार केले. वृद्ध महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे किळसवाणे लैंगिक चाळे केले. बिचा-या असहाय मुलींच्या जन्मदात्रीदेखत असा घाणेरडा आणि विकृतीची परिसीमा गाठणारा शरीरव्यवहार सुरु होता. " बुढी तुम इधर नही, उधर देखने का. सो जाने का क्या? नही तो मार दालुंगा..." हातातल्या शस्रांचा धाक दाखवीत दरोडेखोर धमकावीत होते. एकीने विनवले- "अरे तुम्हाला आया-बहिणी नाही का रे...?" असेही सुनावले. पण त्याच्याने या नराधमांचा आणखीनच भडका झाला. त्यांनी आधीच जीव निजूर झालेल्या वृद्धांच्या छातीत लाथा घातल्या. दह्सःत निर्माण करीत त्यांनी स्वतःची वासना शमवली. आणि मगच दागदागिने,पैसे ओरबाडले,पसार झाले.

भिकाजी टेमगिरे यांना जाऊन आठवडाही झाला नव्हता. त्याचा दशक्रीयाविधी आणखीन तीन दिवस पुढेच होता. यासातिः पै-पै जमा करून बाजार आणला होता. त्या गहू, तांदूळ, साखर, डाळ यांच्या गोण्या फाडून ते सामान झोपडीत फेकून दिले. त्यावर रवाकेल ओतले. जेवढा करता येईल तितका नंगानाच केला. येतानाच दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. जीवे मारून टाकण्याच्या धमक्या आणि प्रचंड दहशत यामुळेच त्यांचा आरडा-ओरडा,काळीज आरपार चिरून टाकणारा आर्त टाहो कोणालाच ऐकू गेला नाही... थेट सकाळी आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार समजला. पोलिसांना खबर दिली. परंतु पोलीस मात्र नेहमीसारखेच वागले. उडवाउडवीची उत्तरे दिली. 'आधी तक्रार तर नोंदवा मग बघू' असा शहाजोगपणाचा सल्लाही दिला. 'गाडी नसल्यामुळे येता येत नाही' अशी असमर्थता व्यक्त केली.गावक-यानीच मग धावपळ केली. अत्याचारीत महिलांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं. तेथेही साराच आनंदी आनंद! मुळात या बायांकडे होत नव्हत ते सार त्या मोगलांनी लुटून नेलेलं. त्यांच्या जवळ आता तर दमडीही नाही. अंगावरच्या वस्रानिशी त्यांना तेथे दाखल केलेले...

कोणाच्या पोटात दुखतेय...कुणाच्या छातीत वेदना होताहेत...कोणाचे डोक दुखतेय... तर कोणाचे आणखीन भलत्याच जागी दुखतेय...कोणाचे कुठे तर कोणाचे कुठे...त्यात सगळ्याच धास्तावलेल्या... तपासणीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचाही तेथे खडखडाट. खरे तर स्त्री रोग तज्ज्ञानेच तपासाव्यात अशा काही बाबी. एकूणच मामला प्रचंड नाजूक आणि त्याहूनही संवेदनशील...मात्र तेथे या पिडीत महिलांवर उपचार करायला होते ते एक भूलतज्ज्ञ आणि दुसरे बाल रोगतज्ज्ञ. यंत्र सामुग्रीच नसल्याने त्या पीडितांची ना होऊ शकली सोनोग्राफी ; ना त्या करू शकल्या सी.टी.स्क्यान.

इकडे या घटनेचा बभ्रा झाला, तसे नेते-लोकनेते, मंत्रीगण, आमदार-खासदार 'त्या' घराला भेटी देण्यासाठी म्हणजे सांत्वनासाठी ताफ्यासह दाखल झालेले...त्यातले काहीजण अत्याचारित महिलांचीही विचारपूस करायलाही येत. जुजबी विचारपूस करून आल्या पावली परतत. जाताना मिडीयाला मुलाखती देताना या निंदनीय घटनेचा निषेध वैगरे करताना हळहळ व्यक्त करीत. पण या पिडीत महिलांना उपचार नीट मिळताहेत की नाही? याची साधी चौकशीही कोणाला करावीशी वाटली नाही! (किंवा 'उपचार' म्हणून विचारपूस करणे अंगवळणी पडलेल्या या लोकांना तशी तसदी घ्यावी, असे वाटले नसेल कदाचित.) घटनेला २० तास उलटून गेल्यावरही त्यांच्या या बेसिक तपासण्या झाल्या नव्हत्या. रात्री नऊच्या सुमारास भेटायला आलेल्या एका आमदार महोदयांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तेथील डॉक्टरला झापले. तेव्हा कुठे या महिलांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले.

दरम्यानच्या काळात दिसून आला तो नागरिकांचा उठलपणा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची बेजबाबदार असंवेदनशीलता. एखाद्या संग्रहालयात डोकावून पाहावे अशा पद्धतीने समाज वार्डातील 'त्या' महिलांकडे पहात होता. बघ्यांच्या झुंडीच्या झुंडी तेथे लोटत होत्या! त्यांची संताप आणणारी किळसवाणी शेरेबाजी तेथे सुरु होती. इलेक्ट्रोनिक मिडीयावाले तर मोठी बातमी हाताला लागल्यासारखेच जणू वागत होते. प्रत्येकाला अत्याचीरीत महिलांचा स्वतंत्र 'बाईट' हवा होता. आणि तोही एकस्क्लुसीव! म्हणूनच की काय ते खोदून खोदून पीडीताना 'बोलते' करीत होते. जणू काही रोज रोज असे प्रकार घडत आहेत आणि ते कव्हर करून ह्यांच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत.

या प्रकरणात पोलिसांची भूमिका पहिल्यापासूनच निराशाजनक आणि गुणवत्ताहीन राहिली आहे. तेथे एखादा 'ब्रेन'कार्यरत आहे, असे कधी जाणवलेच नाही. उलटपक्षी वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची तीव्रता कशी कमी करता येईल, या प्रयत्नातच गुंतले होते. म्हणूनच घडलेल्या प्रकाराला 'सामुहिक बलात्कार' न म्हणता 'साधा रेप' असे वर्णन ते करीत होते. रेपमधेही प्रकार-उपप्रकार असतात, हे लोकांना तेव्हा नव्यानेच समजत होते! या सा-या प्रकाराने पब्लीकमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. राज्याचे पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनाही लोकांनी जाब विचारला. मनाजोगते 'ठाणे' मिळावे,यासाठी वशिल्याचे तट्टू असलेले १० निरीक्षक कामा ना काजाचे नगरच्या मुख्यालयात हटून बसलेले असताना अकोले ठाण्याला २ महिन्यांपासून पोलीस निरीक्षकच नव्हता. घटनेनंतर अत्यंत तत्परतेने त्याच दिवशी सायंकाळी त्याची नेमणूक झाली. नेहमीप्रमाणे याही घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवीत दोघा-तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडून आणले. लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र 'खरे' आरोपी अजूनही मोकाटच फिरताहेत. तपास यंत्रणेतील ढिसाळपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

घटना घडलेल्या परिसरातील ३२ गावे आणि २५ हून अधीक वाड्या असलेल्या परिसराचे कामकाज पाहण्याची जबाबदारी एका पोलिसावर सोपविलेली आहे. दुर्गम असलेल्या अकोले तालुक्यात १९१ गावे आणि १४७ पंचायती आहेत, पैकी ५० पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात घडलेल्या बहुतांश गुन्हांचा तपास लागलेला नाही. न्याय मिळावा यासाठी आता तर लोक पोलीस ठाण्यात हेलपाटेही मारीत नाहीत. कायद्याने ज्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजेत, तेच पोलिसांच्या संगतीत दिसतात. पोलिसांचा इंटरेस्टही भलत्याच ठिकाणी असतो. त्यामुळे दोन नंबरवाल्यांचा 'आत्मविश्वास' भलताच वाढून गेला आहे. त्यांच्या धंद्याला बरकत आली आहे. हा तपशील येथे मुद्दामहून देण्याचे कारण म्हणजे यंत्रणा काय आणि कसे काम करते, हे लक्षात यावे. आणि जास्त - कमी फरकाने हेच आज राज्यातील सा-या तालुक्यांचे प्रातिनिधिक चित्र आहे.

' जेथे जळते बाई, तेथे संस्कृती नाही...' ही घोषणा ज्या मातीतील महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक वर्षापासून देत आल्यात. त्या महाराष्ट्राच्या भूमीत गेल्या १२ वर्षात तब्बल ६० हजारांहून अधिक अभागीनींना या ना त्या कारणाने आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवावी लागली आहे. ' जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका ' असाच हा सारा दुर्दैवी मामला! याच काळात थोड्याथिडक्या नव्हे; तर साडेतेरा हजारजणी नराधमांच्या वासनेच्या शिकार झाल्या, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक छळाच्या हजारो घटना जोडीला आहेतच...दस्तुरखुद्द राज्याच्या गुह् खात्याची ही अधिकृत आकडेवारी पोलिसांचा तपास आणि कार्यपद्धती यांची लक्तरे जशी वेशीला टांगते, तशीच ती स्वतःला पुरोगामी म्हणविणा-या महाराष्ट्राचा हा बुरखादेखील टराटरा फाडून टाकते.

आमच्याच तालुक्यातील राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते विनय सावंत यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीतून मिळालेल्या सदरच्या आकडेवारीवर सहज नजर टाकली की पाहणा-याला अक्षरशः भोवळच येते. खरेच या राज्यात महिला सुरक्षित आहे का? असा प्रश्न मग पडल्याखेरीज राहत नाही. महिला अत्याचाराच्या घटना कमी झाल्याच्या राज्य सरकारच्या दाव्यातील फोलपणाही या आकड्यांतून उघड होतो. न्यायालयात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी जेमतेम आठ टक्के आरोपींना शिक्षा झाली आहे. हे प्रमाण पहिले की, महिला अत्याचारविरोधी यंत्रणा नेमके काय करते ? असा प्रश्न अपोआपच उपस्थित होतो. मग कोठेवाडीपासून काठोड्यापर्यंत आणि आता वीरगावपर्यंतच्या घटना जणू लेकीबाळीच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. किती गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा ठोठावण्यासाठी पोलिसांनी आपले सर्वस्व पणाला लावून तपास केला, हा भाग मग संशोधनाचा विषय ठरतो. महिलांना अत्याचार आणि एकूणच शोषणातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्रयोत्तर काळात करण्यात आलेले कायदे प्रत्यक्षात किती कुचकामी ठरले आहेत, हेही सहजच लक्षात येते. या राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नसल्याच्या आरोपाला यातून अधिक पुष्टीच मिळते. फार कशाला साधे रेल्वे-बसमधून येताना-जाताना, तसेच गर्दीच्या ठिकाणी किती तरी कोवळ्या वयातील मुलींना, तरुणींना आणि अगदी पन्नाशी गाठलेल्या अर्धवट वयातील महिलांनादेखील' नको असलेले ' धक्के खात खातच प्रवास करावा लागतोय,हे कशाचे लक्षण आहे.

पोलीस आणि प्रशासन यांच्यातील पोकळपणा व नाकर्तेपणाचे पितळ वीरगावच्या घटनेने पुरते उघड पडले आहे. एखाद्या भयानक अपघातानंतर घटना स्थळावर रक्ता-मांसाचा सडा पडतो. टे पाहून काळीज पिळवटून निघते. वीरगावला तसे काही दिसले नसले तरी मनावर झालेल्या आघाताची तीव्रता किती तरी पटीने मोठी आहे. प्रत्यक्षात माणुसकीचाच मुडदा पाडला आहे. एकूणच अशा प्रत्येक घटनेनंतर तेवढ्यापुरती चर्चा होत राहते. पुढे ती थांबते. अगदी पुढची घटना घडेपर्यंत. यातून आपण कोणताच धडा घेत नाहीत. वीरगावनंतर तरी आपण काही शिकणार आहोत की नाही..? हा खरा प्रश्न आहे.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )